माळेगावात शैक्षणिक प्रदर्शन; प्रश्न मंजुषा व कळसूत्री बाहुलींच्या खेळाचे आकर्षण
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, मीडिया सेंटर, 13- माळेगाव यात्रेत जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित शैक्षणिक यात्रेत सर्वांचे आकर्षण ठरले आहे. या शैक्षणिक प्रदर्शनात विविध शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, व पंचायत समिती लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रेत शैक्षणिक प्रदर्शनी स्टॉल उभारण्यात आला आहे. या प्रदर्शनात पहिली ते दहावी अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे भाग विज्ञान, भाषा, गणित, स्पर्धा परीक्षेची माहिती तसेच प्रेक्षणीय स्थळे, भौगोलिक स्थिती, शिक्षण विभागाच्या लाभाच्या योजना या विषयाची संपूर्ण माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
तसेच राज्य शासनाने सर्व शाळेतील इयत्ता- पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण, उल्हास ॲप, इलेक्ट्रॉनिक शैक्षणिक साहित्य, पर्यावरण, सूर्यमाला, पवन ऊर्जा, प्रदूषण इत्यादी विषयावर माहितीचे फलक, या शैक्षणिक प्रदर्शनात शिक्षक निर्मिती शैक्षणिक साहित्य, विज्ञान विषयातील निवडक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, अध्यापन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर दर्शवणारे शैक्षणिक साहित्य. विद्यार्थी निर्मित कलाकृतीचे प्रदर्शन, टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य निर्मिती, भित्तिपत्रके, इत्यादीचा समावेश आहे.
उपक्रमशील शिक्षक विलास हसबे यांचा कळसूत्री बाहुलींचा खेळ हे प्रमुख आकर्षण ठरले आहे. सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक वि.मा. काकडे यांनी शैक्षणिक प्रदर्शनात प्रश्नमंजुषा कार्यक्रम ठेवला असून अचूक उत्तरे देणारे विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना रोख पारितोषिक देण्यात येत आहेत. श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे यात्रा कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध शाळांच्या सहलींचे नियोजन असून शालेय विद्यार्थी, शिक्षकांसह शैक्षणिक प्रदर्शनी तसेच यात्रेतील विविध कार्यक्रम उपक्रमांना भेटी देणार आहेत.
प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी बंडू अंदुरकर, गट शिक्षण अधिकारी सतीश व्यवहारे, केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनात ही प्रदर्शनी माळेगाव येथे उभारण्यात आली आहे. यासाठी विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, बिबीषन गुट्टे, अंजली कापसे, सरस्वती अंबलवाड, माळाकोळी, माळेगाव, रिसनगाव, अष्टूर येथील सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, गट साधन केंद्राचे विषय तज्ञ आदी या ठिकाणी भाविकांना शैक्षणिक प्रदर्शनाची माहिती देत आहेत.