जल जीवन मिशनच्या जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा
नांदेड,13- जल जीवन मिशनच्या प्रचार प्रसिद्धीसाठी व विद्यार्थ्यांमध्ये पिण्याचे पाणी व जलसंवर्धन याविषयी जनजागृती होण्यापसाठी शालेय स्तरावर जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल देण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. पिण्याचे पाणी, पाणी पुरवठा योजनांमध्ये लोकसहभाग, पाणी पुरवठा योजना कार्यान्वीअत झाल्यानंतर योजनेची देखभाल दुरुस्तीं तसेच योजना शाश्वत राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्त्रोत बळकटीकरणासाठी जलसंवर्धन याचे महत्त्व विद्यार्थी दशेपासूनच रुजावे व त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात आयोजित करण्यात आल्या आहेत. निबंध स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व माझ्या गावाचा विकास व जलसंवर्धन काळाची गरज हे विषय देण्यात आले आहेत. दोन्ही गटातील निबंधाची शब्द मर्यादा 1500 इतकी असून वेळ 40 मिनिटे राहणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलसंवर्धन व पाण्याचे महत्व, पाण्याचे वितरण व कर प्रणाली, पाणीपुरवठा योजनेतील लोकसहभाग व पाणीपुरवठा योजनेचे दुरुस्ती हे विषय राहणार आहेत. महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेकरिता पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, जलसंवर्धन व पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती हे विषय राहणार आहेत.
शालेय व महाविद्यालयीन स्तरावरून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थींचे तालुकास्तारावर स्पर्धा होतील. तालुकास्तरावर एक ते तीन क्रमांक निवडले जातील. त्या नंतर जिल्हासस्तररावर स्पर्धा घेवून स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत. दोन्ही गटात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 21 हजार, 11 हजार व 5 हजार 500 रुपये रोख बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर निबंध स्पर्धा 2 जानेवारी 2024, वक्तृत्व स्पर्धा 3 जानेवारी 2024 व चित्रकला स्पर्धा 4 जानेवारी 2024 रोजी आयोजित या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकार डॉ. सविता बिरगे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.