उमरी येथील लोकसंवाद कथाकथन सत्र विनोदी कथांनी रंगले
नांदेड,11- उमरी येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात डॉ. विलास ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्रात विनोदी धमाल कथांनी रंगत आणली. प्रा.डॉ. शंकर विभुते, राम तरटे, बालाजी पेटेकर, स्वाती कानेगावकर यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
दाजी काय म्हणल्या व्हत्या, ही राम तरटे यांची कथा ग्रामीण भावविश्वाशी नाते सांगणारी होती. मृत्यूनंतरच्या शोकात्म अवस्थेचे अत्यंत रंजकपणे केलेले चित्रण भावणारे होते. शंकर विभुते यांनी आमदार गणपतराव कथा सादर केली. व्यवस्थेचे अत्यंत मर्मग्रही चित्रण या कथेमध्ये अत्यंत विनोदी पद्धतीने त्यांनी सादर केले. सादरीकरणाच्या विशेष शैलीमुळे ही कथा विशेष दाद घेऊन गेली. बालाजी पेटेकर यांनी लग्न ही कथा सादर केली. मानवी जीवन व्यवहारातील व्यंग अचूकपणे त्यांनी टिपले. स्वाती कानेगावकर यांची कथा गंभीर प्रवृत्तीची होती.
नातेसंबंधाची उत्कट मांडणी त्यांनी केली. सत्राचे अध्यक्ष डॉ. विलास ढवळे यांनी बापून्या.. ही विनोदी कथा सादर केली. महाविद्यालयात नुकत्याच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शहरी भागात आल्यानंतरची अवस्था आणि त्याच्या एकूण अवस्थेचे विनोदी आणि खुमासदार पद्धतीने विवेचन केले. सर्व विनोदी कथांनी सत्र लक्षणीय ठरले.