घरबसल्या बनवू शकता राशन कार्ड, अशा प्रकारे करा आवेदन
मुंबई, 2023 मध्येही सरकार देशातील 80 कोटी लोकांना मोफत राशन देणार आहे. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन एक वर्षासाठी वाढवले आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
रेशनकार्ड हे आपल्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज असून, मोफत रेशन मिळवण्यासाठी ते आवश्यक आहे. त्याशिवाय सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही अजून रेशन कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन सहज बनवू शकता.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
शिधापत्रिका मिळणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी लोकांना आता सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची गरज नाही. आता यासंबंधीची बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. तुम्ही ऑनलाईन रेशन कार्डसाठी अगदी सहज अर्ज करू शकता आणि तुमच्या कार्डची स्थिती देखील पाहू शकता. तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न, पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे यासाठी अर्ज करू शकता.
समजा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर https://mahafood.gov.in/ वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर लॉग इन करा आणि ‘NFSA 2013 अप्लिकेशन फॉर्म’ वर क्लिक करा. तुम्हाला विनंती केलेली सर्व माहिती भरावी लागेल. तुम्हाला तुमची कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करावे लागतील.
यानंतर तुम्हाला ऑनलाइन रेशन कार्ड फी भरावी लागेल. फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे रेशन कार्ड बनवण्यासाठी तुमचा अर्ज केला जाईल. अर्जदाराला वेगवेगळ्या श्रेणीनुसार 5 रुपये ते 45 रुपये शुल्क भरावे लागते.
शिधापत्रिका किती दिवसात बनते?
तुमचा अर्ज आणि त्यात दिलेली माहिती फील्ड ऑफिसरकडून पडताळून पाहिली जाईल. माहिती बरोबर आढळल्यास महिनाभरात तुम्हाला शिधापत्रिका दिली जाईल.
डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार तांदूळ, गहू आणि भरड धान्य अनुक्रमे 3,2,1 रुपये प्रति किलो दराने पुरवते. सरकारने ठरवले आहे की डिसेंबर 2023 पर्यंत ते पूर्णपणे मोफत असेल.