आता ग्राम पंचायतस्तरावर निवडले जाणार नल जल मित्र
नांदेड,5- जल जीवन मिशन अंतर्गत राज्यांमध्ये मोठया प्रमाणात पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू असून ती लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहेत. त्यादृष्टीने योजनेच्या विविध टप्प्यावर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील योजना पूर्ण झाल्यानंतर तसेच योजना हस्तांतरित केल्यानंतर भविष्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने ग्राम पंचायतस्तरावर दीर्घकालीन उपाययोजनाचे नियोजन केले जाणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या वतीने नल जल मित्र ही संकल्पना पुढे आली आहे. या माध्यमातून गावस्तरावर जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आता प्रत्येक गावात नल जल मित्र संकल्पना राबवली जाणार आहे.
या माध्यमातून नल जल मित्र संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचा मानस आहे. ज्यामध्ये प्लंबर, फिटर, गवंडी, पंप ऑपरेटर आणि इलेक्ट्रिशन या विषयांमध्ये ग्रामस्तरावरील दोन व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तरी गावस्तरावरून प्लंबर, फिटर, गवंडी, पंप ऑपरेटर आणि इलेक्ट्रिशन अभ्यासक्रम पूर्ण करणारे व अनुभवी तसेच 20 वर्ष वयापर्यंतचे स्थानिकचे दोन व्यक्तींचे नामनिर्देशन ग्रामपंचायतीकडून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यामध्ये किमान एक महिला असणे आवश्यक आहे. तरी ग्रामपंचायतस्तरावरून प्रशिक्षणासाठी ही नावे जिल्हा परिषदेला कळविण्यात यावीत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्राम पंचायत विभागाचे प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ व कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले आहे. निवड केलेल्या नल जल मित्रांची नावे जिल्हा कक्षास सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.