कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक लाभासाठी जिल्हा परिषदेत विशेष मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती
नांदेड,5- जिल्हा परिषदेतील आस्थापनेवरील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आजपासून विशेष म्हणून हाती घेतली आहे.
जिल्हा परिषदेत कर्मचारी म्हणून नोकरीत रुजू झाल्यानंतर आस्थापनाविषयक बाबी महत्त्वाच्या असतात. प्राथमिक नियुक्ती पासून पदोन्नती, सेवा पुस्तिका व वार्षिक पडताळणी अशा विविध 34 बाबींची माहिती अद्यावत असणे महत्त्वाचे असते. परंतु या बाबी परिपूर्ण नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या निदर्शनात आले. कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबी अद्यावत नसतील तर त्या कर्मचाऱ्यांना सेवा काळात वैयक्तिक लाभ मिळत नाहीत. तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी अडचणी निर्माण होतात. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हा परिषदेअंतर्गत वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबी कर्मचारी निहाय अद्यावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुगल शिट तयार करून सर्व विभागातून कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभागातील वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गाचे 10 हजार 400 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची गुगल शीटव्दारे माहिती भरून घेतली जात आहे. यामध्ये विविध 34 विषयांची माहिती अद्यावत केली जात आहे. यात जन्मतारीख पडताळणी झाली आहे काय, वैद्यकीय तपासणी पडताळणी नोंद आहे काय, भाषा परीक्षा सूट आहे काय, जात पडताळणी नोंद आहे काय, संगणक परीक्षा पास नोंद, स्थायित्वाचा लाभ, लागू असलेल्या सेवा परीक्षा उत्तीर्ण आहे काय, जीपीएफ/डीसीपीएस स्लीप, वेतन पडताळणी पथकाकडून तपासणी, 10, 20 व 30 वर्षानंतर सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, वेतन आयोगाची पडताळणी, विमा कवच नोंद,
मूळ व दुय्यम सेवा पुस्तिका अद्यावत आहे काय, वरिष्ठ श्रेणी लाभ, मागील वर्षाचे मत्ता व दायित्व दिले काय, गोपनीय अहवाल, सर्व प्रकारचे रजा लेखे अद्यावत आहेत काय, सेवा पुस्तकांची वार्षिक परताळणी आदी 34 विषयांची प्रत्येक कर्मचाऱ्यांची माहिती अद्यावत करण्यात येणार आहे. सदर माहिती अद्यावत झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक लाभ बाबतच्या अडचणी दूर होतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची परिपूर्ण माहिती भरलेली आहे. त्या कर्मचा-यांना तात्काळ लाभ देण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.