अशोक चव्हाण यांची तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती
राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांची तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खर्गे यांनी अशोक चव्हाण आणि कर्नाटकचे मंत्री एन.एस. बोसराजू यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खा. के.सी. वेणुगोपाल यांनी एका पत्रकान्वये दिली आहे. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्याच्या राजकारणात मागील काही दशकांपासून महत्वाची भूमिका वठवणाऱ्या अशोक चव्हाणांवर गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. उदयपूर व रायपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये त्यांना राजकीय मसुदा समितीची जबाबदारी देण्यात आली होती. गोवा, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांमध्ये ते काँग्रेसचे स्टार प्रचारक होते. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यातील निवडणुकींच्या समीक्षेची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्यात आली होती. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी त्यांना काँग्रेस पक्षाचे समन्वयक म्हणून नेमण्यात आले होते. काँग्रेस पक्षात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीवरही त्यांना नुकतेच स्थान देण्यात आले आणि आता त्यांच्यावर तेलंगणा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे विशेष निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.