मराठवाडा

नारायण राणेंनी ९६ कुळी मराठ्यांच्या स्वाभिमानाला हात घातला, मनोज जरांगेंचं सणसणीत प्रत्युत्तर

पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला असताना या नेत्यांनी अन्नात माती कालवू नये, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या एकसदस्यीय समितीने मराठा आरक्षणासाठीचा अहवाल तयार केला होता. मराठा आरक्षणाच्या आजवरच्या लढ्यात राणे समितीचा हा अहवाल प्रमाण मानला गेला. मात्र, आता मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी लावून धरल्यानंतर नारायण राणे यांनी त्याला विरोध केला आहे. मी ९६ कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही, अशी ठाम भूमिका नारायण राणे यांनी घेतली होती. राणेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांना नारायण राणे यांच्या वक्तव्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले की, राज्यातील सरकार १०० टक्के मराठा समाजाविरोधात उठले आहे. २०२४ पर्यंत आम्ही शांत राहणार आहोत. सरकार कोणाला पुढं घालतंय ते पाहू. २०२४ मध्ये मराठा समाज काय असतो, हे आम्ही दाखवून देऊ. सामान्य मराठ्यांमध्ये फूट पाडणे सोपे नाही. सामान्य शेतकऱ्यांना सरकारने डिवचू नये, शांत राहावं, घेतलेल्या वेळेत आरक्षण द्यावे. सरकारने आता आमचा अंत बघू नये. आतापर्यंतच्या लढ्यात बळी गेलेल्या मराठा बांधवांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने मराठ्यांचे बळी घेऊ नयेत. ही गोष्ट सरकारला महागात पडेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. जुन्नर, बारामती, फलटण, दहिवाडी परिसरात त्यांच्या सभा होणार आहेत. आज राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मराठा समाजाला येत्या २४ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होईल. पण हे शांततेचं युद्धही सरकारला पेलवणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

कुणबी आरक्षण घेण्यात कमीपणा नाही: मनोज जरांगे पाटील

राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव आरक्षण मागत आहेत. कुणबी नावाने आरक्षण घेण्यात काहीही वाईट नाही. कुणबी म्हणजे शेती करणारा. आमचा बापजादा शेती करायचा, श्रीमंत मराठाही शेती करायचा. त्याला फक्त कुणबी हे नाव होतं. मराठा समाजाला क्षत्रिय आणि कुणबी अशी दोन अंग आहेत. त्यामुळे कुणबी या शब्दाशी नातं तोडता येणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button