असदुल्लाबाद इनामी जागेचा प्रश्न मार्गी लागण्याची चाहूल
नांदेड दि. १५ शहरातील असदुल्लाबादसह मराठवाड्यातील इनामी जागा जमिनींच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसी बैठकीत याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे निर्देश दिले तसेच या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.सत्ताधारी आ.बालाजी कल्याणकर यांना या बाबतची चाहूल लागताच त्यांनी श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे.
शहरातील असदुल्लाबाद भागातील २६ सर्वे क्रमांकातील जमिनीच्या मूळ अभिलेखांवर मददमश इनाम अशी नोंद असल्याने गेल्या चाळीस वर्षांपासून वस्ती असलेल्या या भागातील भूखंडधारकांना दस्तनोंदणी,हस्तांतरण तसेच बांधकाम परवानगीचे प्रस्ताव थांबले असल्याची माहीती काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.निलेश पावडे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिली तसेच हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती. यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करीत माहीती घेतली असता नांदेडच नव्हेतर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात इनामी जागेचा प्रश्न असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत इनामी जागा जमिनींच्या प्रश्नांवर तोडगा काढावा अशी सातत्यपूर्ण मागणी केली.
या प्रकरणी पावसाळी अधिवेशनाच्या काळात ४ ऑगस्ट रोजी विधानभवनात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते यावेळी माझ्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा ,अॅड.निलेश पावडे,तत्कालीन तहसीलदार किरण अंबेकर यांची विधानभवनात तर मराठवाड्यातील सर्वच जिल्हाधिकारी,व्हीसीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. असाच प्रश्न बीड येथील असल्यामुळे माजी महसूल राज्य मंत्री आ.सुरेश धस यांचीही उपस्थिती होती.इनामी जमिनीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आवश्यक बाबीचा समावेश करीत प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यामुळे जिल्हाधिकारी यांचा प्रस्ताव पोहचताच शासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहेत. सत्तेत असलेल्या आ. बालाजी कल्याणकर यांना याची चाहूल लागताच त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे.