आमदार हसन मुश्रीफ, देवणेंसह कार्यकर्त्यांवर कर्नाटक पोलिसांचा लाठीचार्ज, कोगनोळी टोलनाक्यावर तणाव
बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी महामार्गावरील दुधगंगा नदी पुलावर रोखले.
यावेळी कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्ते बॅरॅकेटस जवळ येताच कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्ज करत मागे केले. या घटनेने महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला. महामार्गावरील एका बाजुची वाहतुक बंद करावी लागली.
महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीत बसवले. मात्र, काही वेळानंतर त्यांना सोडून दिले. सुनिल मोदी, आर के पोवार, राजु लाटकर, भय्या माने, आदील फरास, भारतीताई पवार विद्या गिरी, कांचन माने असिफ मुल्लाणी , संजय चितारी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
..तर मराठी माणसावर किती अन्याय असेल
यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, आमच्यावर लाठीहल्ला करीत दादागिरी करणारे बोम्मई सरकार कर्नाटकात मराठी माणसावर किती अन्याय करीत असेल. हे सिद्ध झाले आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारा दिलेल्या अधिकाराचा हक्क बजावीत शांततेच्या मार्गाने बेळगावला जात होतो. पण कर्नाटकातील भाजपा सरकारने आम्हा रोखुन धरले. माझ्यावर कर्नाटक पोलिसांनी लाठी प्रहार केला. याचा मी निषेध करतो. या पुढेही मराठी भाषिकांसाठी आमचे आंदोलन सुरूच राहिल. बिदर -भालकी बेळगाव कारावार सह संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.