चार महिन्यांत आई-वडिलांसह भावाचाही मृत्यू, पण ती डगमगली नाही; NEET परीक्षेत घवघवीत यश
नांदेड : घरात अठरा विश्वे दारिद्र्य आणि त्यातच डोक्यावरील कुटुंबाचं छत्र हरपलं असताना हदगाव तालुक्यातील एका तरुणीने संकटावर मात करत नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. प्रतिभा विनायक वाठोरे असं या मुलीचे नाव असून तिने नीट परीक्षेत ५८४ गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे कुठलीही खाजगी शिकवणी न लावता तिने हे यश मिळवलं आहे. जिद्द आणि मेहनतीने मिळवलेल्या तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
प्रतिभा वाठोरे ही हदगाव तालुक्यातील हरडफ या छोट्याशा गावात वास्तव्यास आहे. आई, वडील, भाऊ आणि बहीण असं चार जणांचं कुटुंब होतं. मुलीला डॉक्टर करण्यासाठी आई-वडील मोलमजुरी करुन पैसे जमवत होते. मात्र नियतीला हे मान्य नव्हतं. वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एका पाठोपाठ कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मागील वर्षी जून महिन्यात प्रतिभाच्या आईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर जुलै महिन्यात तिच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झालं. आई-वडिलांच्या या अकाली निधनाने प्रतिभाच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं. दोन्ही मुलं पोरकी झाली होती. अशा संकटातही स्वत:चं आणि भावाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रतिभा नांदेड शहरात येऊन राहिली.
शहरातील एका महाविद्यालयात बारावीसाठी प्रतिभाने प्रवेश घेतला. परिस्थितीवर मात करून दोन्ही भावंडे शिक्षण पूर्ण करत होते. मात्र सप्टेंबर महिन्यात भावाचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. चार महिन्यांत एका पाठोपाठ कुटुंबातील तीन प्रमुख व्यक्तींची साथ सुटल्याने प्रतिभा एकटी पडली. एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं कसं जावं, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. मात्र तिला आपल्या आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. हेच स्वप्न उराशी बाळगत तिने आपलं शिक्षण सुरूच ठेवलं. कुठलीही खाजगी शिकवणी न लावता तिने भाड्याच्या खोलीत राहून नीटच्या परीक्षेची तयारी केली. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर ५८४ गुण घेऊन ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिच्या या जिद्दीला बळ देण्यासाठी गावातील नागरिकांनी आर्थिक हातभार लावला. प्रतिक्षाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
प्रतिभा वाठोरे हिची हलाखीची परिस्थिती आहे. कुटुंबातील आई, वडील आणि भावाच्या अकाली निधनाने ती एकटी पडली आहे. नीटमध्ये चांगले गुण घेतले असले तरी तिला डॉक्टर होण्यासाठी मोठ्या मदतीची गरज आहे.