मराठवाडा
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे मुंबई येथे आयोजन
परभणी, दिः 5 जून . नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 2000 पेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक संमेेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेेलन, भारत’ हे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटर मध्ये दि. १५ जून ते १७ जून २०२३ या दरम्यान होत आहे. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहेत. या संबंधीची सविस्तर माहिती राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रकाश महाले, व्यंकटेश जोशी व ऋषिकेश कोंडेकर उपस्थित होते.
राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश ठेऊन आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा उद्घाटन सोहळा १६ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. या व्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे.
भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, श्री.शिवराज पाटील चाकुरकर, श्री.मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.
हे संमेलन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजनाः शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती या विषयांवर चर्चा होणार आहे. कार्यः जीवन संतुलनः यशाची गुरूकिल्ली, आपला मतदार संघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आपली प्रतिमा तयार कराः साधने आणि तंत्रे, विधिमंडळ कार्यप्रदर्शनः अपेक्षेनुसार जगणे आणि सामाजिक कल्याणासाठी सहयोगः नोकरशहा आणि आमदार या विषयांवर चर्चा होणार आहे.
गोलमेज परिषदेत भारत २०४७ : आमचे लक्ष : सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, राजकारणाचे अध्यात्मिकीकरण : अध्यात्मिक नेत्यांची चर्चा, अमृत कालमध्ये भारताचे परिवर्तन : व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील लिडर्सची चर्चा, विधिमंडळाचे कामकाज : आव्हाने आणि पुढील मार्ग सर्व राज्य विधानमंडळांच्या सचिवांची चर्चा, भारत २०४७ : आमचे लक्ष : सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, माध्यम २०४७ : भूमिका आणि जबाबदार्या : संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांची चर्चा, कायदा आणि नागरिक २०४७ : आमचे लक्ष : कायदेशीर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे.
वरील विषयांवरील प्रत्येक सत्रांमध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्ष पद विधानसभेचे सभापती, विधानपरिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे भूषविणार आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनात आतापर्यंत भारतातील सर्व राज्यातील एकूण १८०० आमदारांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. तसेच, एकूण २५०० आमदार येण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय विधायक संमेलन देशातील वेगवेगळ्या राज्यातील आमदारांना एकमेकांमध्ये संवाद घडविणे, सुशासनाच्या मुद्यांवर शिकणे आणि लोकशाहीला शक्तीशाली बनविण्यासाठी निर्माण केले गेले आहे.
लोकशाही राज्यपध्दतीनुसार लोकांनी विश्वासाने निवडून दिलेला आमदार हा लोकप्रतिनिधी शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. स्थानिक पातळीवर आमदारांनी प्रत्यक्ष कृतितून साकारलेला सर्वांगीण शाश्वत विकास म्हणजेच खर्या अर्थाने राष्ट्रनिर्माण असे निश्चितपणे म्हणता येईल. राष्ट्रीय विधायक संमेलनातून देशातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात शाश्वत स्वरूपाचा सर्वांगीण विकास साधण्याची नवचेतना, नवप्रेरणा, अभिनव व्यापक दृष्टि आणि निश्चित दिशा मिळणार आहे. देशातील आमदारांना या संमेलनातून मिळणारी रचनात्मक कार्याची प्रेरणा, चेतना, दृष्टि आणि निश्चित दिशा हे राष्ट्रीय विधायक संमेलनाचे फार मौलिक स्वरूपाचे फलित असू शकेल.
राष्ट्रीय एकात्मिकतेचा, राष्ट्रीय लोकशाहीच्या सर्वांगीण सशक्तीकरणाचा आणि राष्ट्राच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचा कृतिशील विचार देशातील विविध राज्यांनी स्वतंत्र व एककल्ली न करता त्यांचे राज्य म्हणून असणारे स्वातंत्र्य व वैविध्य जपत एकत्रित, एकात्मिकपणे करणे अधिक व्यवहार्य ठरणारे आहे. प्रामुख्याने हे विचारसुत्र समोर ठेवून देशातील सर्व आमदारांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणणारे हे संमेलन म्हणूनच फार पायाभूत कार्य साधणारे ठरणार आहे.
देशामध्ये प्रथमच घडून येणारे हे संमेलन देशाला सतत पुरोगामी विचार आणि नेतृत्व देणार्या महाराष्ट्राच्या भूमित म्हणजेच मुंबईत होत आहे. महाराष्ट्र शासन या संमेलनाच्या आयोजनात यजमानाच्या भूमिकेतून सहभागी झाले आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा अखंडपणे अभ्यास आणि संशोधन साक्षेपाने करणार्या जाणत्या, विचारवंत, पत्रकार, साहित्यिक, कृतिशील सामाजिक कार्यकर्त्यांकडून ‘राष्ट्रीय विधायक संमेलना’चे स्वागत व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.