कॉलेज तरुणीचा उपचारादरम्यान अचानक मृत्यू, ४ चुकीचे इंजेक्शन्स दिल्याचा आरोप, मृतदेह शवगृहातच!
नांदेड : शहरातील एका शासकीय रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र, डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मागील चार दिवसांपासून तरुणीचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवगृहात आहे. प्रजापती शंकर लांडगे असं या मृत तरुणीचं नाव आहे.
प्रजापती लांडगे ही नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे राहत होती. नांदेड शहरातील श्री गुरुगोबिंदसिंग शासकीय रुग्णालयातील पारिचारिका प्रशिक्षण केंद्रात ती नर्सिंगचे प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान, १८ मे रोजी नर्सिंग कॉलेजमध्ये असताना तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी आणि अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी तिला ताबडतोड विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, १९ मे रोजी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रजापती ही अभ्यासात हुशार होती. बारावी परीक्षेत तिने ९५ टक्के गुण मिळवले होते. नर्स होण्याचे तिचे स्वप्न होते.आई वडिलांनी वीटभट्टीवर मोलमजुरी करुन तिला शिकवले आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यास बळ दिले. पण, नियतीला हे मान्य नव्हते. मुलीच्या मृत्युने लांडगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याचा नातेवाईकांचा आरोप
प्रजापती हिच्या मृत्यूला रुग्णालयातील संबंधित डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. ‘तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तीन ते चार चुकीचे इंजेक्शन दिले. त्यामुळे तिला रक्ताच्या उलट्या देखील झाल्या. चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रजापतीचा मृत्यू झाला,’ असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. या मागणीसाठी मयत तरुणीच्या नातेवाईकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
प्रजापतीचा मृतदेह अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत
मुलीच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत डॉक्टरांविरोधात कारवाई होणार नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून प्रजापतीचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे.