पुण्यातून लग्नासाठी परभणीकडे निघाले, पण वाटेत कारला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर
परभणी : लग्नाला जात असताना भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंपरी गीते गावाजवळ घडली. प्रकाश उत्तम मोहिते असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांवर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
पुणे इथून औंढा नागनाथ येथे लग्नासाठी चार जण एका कारने येत होते. त्यांची कार जिंतूर जालना महामार्गावरील पिंपरी गीते गावाजवळ आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार महामार्गाच्या कडेला पलटली. या अपघातामध्ये कारमधील नारायण आत्माराम पवार (३० ), विकास विठ्ठल मोहिते (३५, जि. पुणे), नाथा नखुल पवार (४५, सर्व रा. जुन्नर जि. पुणे) हे तिघे जण गंभीर जखमी झाले. तर प्रकाश उत्तम मोहिते (३२, रुई पिंपळा ता. धारूर, जि. बीड) हा तरुण जागीच ठार झाला.
दरम्यान, या अपघाताची माहिती चारठाणा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वायाळ, पो. हे. कॉ. सुधाकर कुटे, जिलानी शेख, वानरे आदी तात्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोलिसांना बालाजी गिते, शिवाजी घुले, नवनाथ पालवे यांनी जखमींना कारमधून बाहेर काढण्यासाठी मदत केली.
अपघातातील जखमींना उपचारासाठी चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून चालक शेख इसाकोद्दीन यांनी पोलिसांच्या मदतीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अंभुरे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर उपचार केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अंभुरे यांनी प्रकाश उत्तम मोहिते यास तपासून मृत घोषित केले. तसंच अन्य तीन जणांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे.