बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का! भावाचा बहिणीला तर काकाचा पुतण्याला छोबीपछाड
बीड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. सहा बाजार समिती पैकी चार बाजार समितीवर बहुमताने वर्चस्व मिळवलं आहे.
बीड, 29 एप्रिल : जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारत जिल्ह्यातील सहापैकी पाच बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपला एकाच बाजार समितीवर समाधान मानावे लागले. बीड जिल्ह्यातील 9 पैकी सहा बाजार समितींसाठी काल मतदान झाले. यातील वडवणी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एकहाती वर्चस्व मिळवले. आज पाच बाजार समितीचा निकाल लागला. यामध्ये गेवराई, परळीमध्ये 18 जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. तर आंबेजोगाई मध्ये 18 पैकी 15 जागा मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. भाजपाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले.
बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी सर्व पक्षी आघाडी करत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना इतर पक्षांच्या मदतीने मात दिली. 18 पैकी पंधरा जागेवर विजय मिळवत झेंडा फडकवला तर जयदत्त क्षीरसागर यांना तीन जागेवर समाधान मानावे लागले. तर परळीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत अठराच्या अठरा जागेवर वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपला भोपळा देखील फोडता आला नाही. गेवराईत पुन्हा एकदा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गड कायम राखला. अंबाजोगाईतही आमदार धनंजय मुंडे गटाचे वर्चस्व राहिले. 18 पैकी 15 जागा महाविकास आघाडीच्या तर तीन जागा भाजपच्या आल्या. केजमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले. भाजप नेते रमेश आडसकर व आमदार नमिता मुंदडा गटाचे 14 उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचे चार उमेदवार निवडूण आले. आतापर्यंत तरी वडवणी, अंबाजोगाई, गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे.