अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव | राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कांत आहेत. अधिवेशनापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
ते जळगावमध्ये बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहिती आहे, जोपर्यंत मंत्रिमंडळचा विस्तार होत नाही तोपर्यंतच आपलं सरकार आहे. एकदा का मंत्रिमंडळ विस्तार झाला की हे सरकार शंभर टक्के कोसळणार. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे स्टेजवर बसले आहेत, जबाबदारीने सांगतो हे सरकार कोसळणार आहे. पुन्हा आपली सत्ता येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याचं वृत्त आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.