मविआच्या ‘वज्रमुठ’ सभेत ‘या’ प्रमुख नेत्यांची भाषणं होणार, यादी ठरली, नावंही फायनल!
छत्रपती संभाजीनगर शहरात आज महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ सभा’ पार पडत आहे.
तर पहिल्यांदाच तीनही पक्ष एकत्र सभा घेत आहे. विशेष म्हणजे, याच सभेतून शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. मात्र या सभेत तीनही पक्षातील कोणत्या प्रमुख नेत्यांचे भाषणं होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. तर या सभेत प्रमुख सहा भाषणं होणार आहे.
महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचे भाषणं होणार आहे. तर याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभेचं सूत्रसंचालन करणार आहेत. तर सभेच्या ठिकाणी दुपारी दोन वाजेपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी येण्यास सुरूवात होईल. तसेच साधारण 5 वाजता सभेला सुरूवात होईल. तर उद्धव ठाकरे यांचे भाषण संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
नेतेमंडळी होतायत शहरात दाखल…
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र या सर्व घटनेनंतर आज पहिल्यांदाच महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्र सभा घेत आहे. त्यामुळे या सभेची राज्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान ही सभा सुरू होण्यासाठी अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक राहिला असून, महाविकास आघाडीमधील राज्यभरातील नेतेमंडळी शहरात दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर सकाळच्या विमानाने अनेक नेते मुंबईहून शहरात दाखल होताना पाहायला मिळाले आहेत. तर मराठवाड्यातील अनेक नेते वाहनाने शहरात दाखल होताना पाहायला मिळत आहे.
अमित देशमुखांची प्रतिक्रिया…
दरम्यान आजच्या महाविकास आघाडीच्या सभेवर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले की, आजची सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी सभा असेल. इथले वातावरण गढूळ होण्यास चार दिवसाची पार्श्वभूमी नाही. देशात अनावश्यक मुद्द्यांना उचलून धरल जातेय, त्यामुळे वातावरण गढूळ होत आहे. ही सभा होऊ नये यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. चौकशीअंती संभाजी नगरातील वातावरण खराब करणारे समोर येतील. पण ही सभा खूप पूर्वीच जाहीर झालेली आहे, त्यामुळे ते पुढे ढकलण्याचा प्रश्न नव्हता. कटकारस्थान करून सत्तांतर घडवलं गेलं, हे महाराष्ट्राला पटलं नाही. जनतेची महाविकास आघाडीकडून अपेक्षा असून, आजच्या सभेने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणतील असेही अमित देशमुख म्हणाले.