कृषी
सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेवूत, -आ. सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका
परभणी : (प्रतिनिधी मोहम्मद बारी) राज्यातील भाजपा – शिवसेना(शिंदे गट) सत्तेत आल्यापासून सर्वसामान्यासह शेतकर्यांची आडवणूक होत आहे. शेतकरी विरोधी निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक डबघाईला आला आहे. शेतकर्यांना महाविकास आघाडीच न्याय देऊ शकते. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळीची विचारविनिमय करुन व सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेवूत असे प्रतिपादन आ. सुरेश वरपूडकर यांनी केले.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र बुधवार २९ मार्च रोजी काँग्रेसच्या बैठकीत निवडणूक लढण्याचा मनोदय काँग्रेसच्या नेते मंडळीने केला. वसमत रोडवरील राजयोग मंगल कार्यालयात काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आ. सुरेश वरपूडकर हे बोलत होते. या मेळाव्यास माजी माजी आ. सुरेश देशमुख, रामभाऊ घाडगे, धोंडिराम चव्हाण, स्वराजसिंह परिहार, दिलीपराव देशमुख, भगवान वाघमारे, शिवाजीराव बेले, तुकाराम वाघ, पंजाबराव देशमुख, समशेर वरपूडकर, गणेश घाडगे, दत्तराव रेंगे, पांडुरंग लोखंडे,शामराव इंगळे, विनय बंठीया, श्रीधर देशमुख, रामेश्वर खंटिंग विनोद लोहगावकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. वरपूडकर म्हणाले की, आज सर्वसामान्य घटक, शेतकरी, शेतमजूर, कामगार महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्यामुळे एकत्र लढलो तर जास्तीत जास्त जागा मिळवता येईल. याकरीता आपण महाविकास आघाडीच्या सर्वच स्थानिक नेतेमंडळीशी संपर्क करुन चर्चा करणार आहे आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या मेळाव्यात माजी आ. सुरेश देशमुख, अॅड. स्वराजसिंह परिहार, भगवान वाघमारे,रामराव घाडगे, पंजाबराव देशमुख, समशेर वरपूडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सोसायटी चेअरमन व संचालक मंडळ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी मतदार व हमाल मापाडी सदस्य, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन उद्धव रामपुरिकर यांनी केले तर आभार सुहास पंडित यांनी मानले