तुमच्या मुलांमध्येही दिसतात की लक्षणं ? अशक्तपणामुळे होऊ शकतो त्रास, अशी घ्या काळजी
नवी दिल्ली : घरात लहान मुलगा असो वा मुलगी ते सर्वांचेच लाडके असतात. आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेमही करतात.
पण त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. लहान मुलं बऱ्याच वेळेस आजारी पडत असतात, पण आजारी पडण्यापूर्वी अनेक लक्षणेही मुलांमध्ये दिसतात. फक्त त्याकडे वेळीच लक्ष देऊन काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणजे मुलांना कमी त्रास होतो. सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
दिवसभर थकवा जाणवणे
जर तुमचं मूल निस्तेज वाटत असेल, दिवसभर नीट खेळत नसेल, कोणत्याही कामात रस घेत नसेल. त्यांना डोकेदुखीची तक्रार असेल तर अशावेळी मुलाकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. हे बालकांच्या अस्वस्थ आरोग्याचे लक्षण आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे.
धावल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे
धावताना श्वास आणि हृदयाचा वेग वाढणे सामान्य आहे. लहान किंवा मोठे कोणतेही मूल वेगवान पावलांनी धावत असेल किंवा चालत असेल तर अशा स्थितीत हृदयाची गती वाढते. पण खेळताना श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल आणि छातीत दुखत असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे.
सतत पाय दुखण्याची तक्रार
कधीकधी मुलांच्या पायात वेदना होतात. हे सहसा पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे होते. धावताना, उडी मारताना किंवा सर्वसाधारणपणे चालताना त्यांना वेदना होऊ लागतात. कधीकधी लहान मुलांचे पाय चालतानाही दुखतात. अशा परिस्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे. हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असू शकते.
ताप येणे
अशी अनेक मुले असतात, ज्यांना दर आठवड्याला किंवा दर काही दिवसांनी ताप येतो. अशा मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली की, वारंवार ताप येत राहतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ औषधेच घेऊन उपयोग नाही, तर त्यांना आहारातूनही पोषण मिळणे महत्वाचे आहे.
चेहऱ्यावर त्रास जाणवणे
मुलांमध्ये अशक्तपणाचे सामान्य लक्षण म्हणजे मुलांचा चेहरा कोरडा पडतो. ओठ फुगणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, अंगावर पुरळ येणे, गिळताना त्रास होणे ही लक्षणे आहेत. याकडे वेळीच नीट लक्ष देऊन डॉक्टरांकडे जाऊन उपचार केले पाहिजेत.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)