फुले व जनता मार्केटवरील स्थगिती अखेर मागे
खा. चिखलीकर विकासाचे मारेकरी; त्यांनी नांदेडकरांची माफी मागावी! डी.पी. सावंत यांचे टीकास्त्र
नांदेड, दि. २४ मार्च २०२३:
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महात्मा फुले व्यापारी संकुल व जनता मार्केट शिवाजीनगर व्यापारी संकुलाच्या कामावरील स्थगिती अखेर राज्य सरकारने मागे घेतली असून, केवळ राजकीय आकसापोटी व कोणतेही कारण नसताना ही स्थगिती लादणारे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रकरणी नांदेडकरांची माफी मागावी, अशी मागणी माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी केली आहे.
येथील महात्मा फुले व्यापारी संकुलाबाबत विकासकासोबत केलेला करार आणि जनता मार्केट शिवाजीनगर व्यापार संकुलाच्या निविदेला देण्यात आलेली स्थगिती राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय काढून मागे घेतली आहे. विशेष म्हणजे या शासन निर्णयामध्येच ही स्थगिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेल्या पत्रानुसार देण्यात आली होती, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेला ही कामे स्वनिधीतून करणे शक्य नसल्याने बीओटी व पीपीपी तत्वावर हाती घेण्यात आलेल्या या कामांच्या प्रक्रियेत मनपाकडून नियमांचे काटेकोर पालन झाल्याबाबतही राज्य सरकारने मोहर लावली आहे. असे असताना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्यात सत्तांतर होताच अवघ्या दोन आठवड्यात या कामांवर स्थगिती नेमकी कशासाठी आणली, असा सवालही डी.पी. सावंत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना उपस्थित केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील विकास कामांच्या अनुषंगाने खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडले आहे. शहरातील दोन व्यापारी संकुलांच्या कामांवर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नसताना केवळ अशोकराव चव्हाण यांना विरोध म्हणून खासदारांनी राज्य सरकारकडून स्थगिती आणली. परंतु, स्थगिती आणण्याचा सबळ हेतू स्पष्ट न करता आल्याने शेवटी राज्य सरकारला ती मागे घ्यावी लागली. यातून हे काम तब्बल आठ महिने रेंगाळले. नांदेड शहराच्या हद्दीतील १५० कोटी रूपयांची विकास कामे पूर्णत्वास येण्याच्या टप्प्यात असताना निधी वितरणावर स्थगिती लावली गेली. पैसेच नसल्याने कंत्राटदारांनी कामे अर्धवट स्थितीत बंद केली. त्यातून नांदेडकरांना अकारण गैरसोय सोसावी लागली. शेवटी औरंगाबाद खंडपिठाने ताशेरे ओढून ही स्थगिती मागे घेण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे हे काम विद्यमान मुख्यमंत्री मागील सरकारमध्ये नगरविकास विभागाचे मंत्री असताना मंजूर झाले होते. त्याच कामाला स्थगिती आणून व शेवटी औरंगाबाद खंडपिठात राज्य सरकारची मानहानी करून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी काय साध्य केले? अशीही विचारणा काँग्रेस पक्षाचे नेते डी.पी. सावंत यांनी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू झाला होता. अनेक रेंगाळलेली विकासकामे त्यांनी मंजूर केली व नवीन प्रकल्पही मंजूर करून घेतले. नांदेड जिल्ह्याच्या हितास्तव विकासकामांची ही गती कायम ठेवण्याऐवजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यात अडथळे आणले. जिल्ह्यात विकासकामे खेचून आणण्याऐवजी स्थगितीचे आदेश मिळवण्यात धन्यता मानली. शहरातील दोन व्यापारी संकुलांच्या कामांवरील स्थगिती खा. चिखलीकर यांच्यामुळेच दिल्याचे थेट शासन निर्णयात नमूद असल्याने ते नांदेड जिल्ह्याच्या विकासाचे मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशीही घणाघाती टीका डी.पी. सावंत यांनी केली.