राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची पक्षातून हकालपट्टी; KCR यांच्याशी वाढली होती जवळीक
मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या बीआरएस पक्षाने राष्ट्रीय उभारणी घेत अनेक राज्यात शिरकाव केला आहे. त्यात महाराष्ट्रातही नांदेड इथं केसीआर यांनी सभा घेत अनेक नेत्यांचा त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेतला.
आता याच पक्षाशी जवळीक वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी माजी आमदार शंकर धोंडगे यांना उद्देशून पत्रक काढले आहे. त्यात म्हटलंय की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्यप्रमुख या पदावर कार्यरत आहात. असे असतानाही आपणांस वारंवार सूचना देऊनदेखील पक्षविरोधी वर्तन करणे, पक्षशिस्तीचे पालन न करणे यामुळे आपणांस पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात येते याची नोंद घ्यावी असं म्हटलं आहे.
कोण आहेत शंकर धोंडगे?
शंकर धोंडगे हे कंधार लोहा मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांनी शेतकरी चळवळीत अनेक आंदोलने केली आहेत. धोंडगे हे शरद पवारांच्या जवळचे मानले जायचे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या किसान सभेच्या राज्यप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून शंकर धोंडगे यांची जवळीक तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी वाढली होती. धोंडगे यांची केसीआर यांच्याशी काही दिवसांपूर्वी ३ तास चर्चा झाल्याचेही म्हटलं जाते. त्यानंतर शंकर धोंडगे हे बीआरएसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती.
मागे मेळाव्यात शंकर धोंडगे म्हणाले होते की, तेलंगणा राज्यात मागील ८ वर्षात होत्याचं नव्हते झाले. महाराष्ट्रात धनाची नाही आणि मानाची कमी नाही पण तरीही शेतकरी आत्महत्या का करतात? माझा कुणावारही राग नाही. कुणावर टीका करणार नाही. माझ्या राजकारणात चुका झाल्या असतील. आजची परिस्थिती स्थिर नाही. मी काही दिवसांत माझी भूमिका जाहीर करणार आहे असं त्यांनी जाहीर केले होते.