मराठवाडा
महाराष्ट्राला समृद्ध करणारा अर्थसंकल्प – आमदार सौ. मेघना बोर्डीकर
परभणी,(परभणी जिल्हा प्रतिनिधी) : शेतकरी- कष्टकर्यांपासून ते समाजाच्या अंतिम घटकापर्यंत सर्वार्थाने पोहोचलेले हे क्रांतिकारी बजेट आहे, असे आपण या अर्थसंकल्पाचे वर्णन करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य माणसाला समृद्ध करणार्या या ‘पंचसूत्री बजेट’चे आपण मनःपूर्वक स्वागत करत आहोत, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केली.
‘भिजत घोंगडे’ असं वर्णन असलेल्या परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत उभारणी संदर्भात आपण अनेक वेळा विधानसभेत मागणी केली. यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये याबाबत आश्वासक पाऊले उचलण्यात आली होती. मात्र त्यानंतर दुर्दैवाने या राज्यात आलेल्या महाविकास आघाडीने प्रादेशिक भेदभाव करत परभणीतील या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नाला तसेच लटकत ठेवले. हा परभणीकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने या ऐतिहासिक अर्थसंकल्पात निधीची घोषणा करून मार्गी लावला आहे, याचा आनंद होतो आहे, असे सौ. बोर्डीकर यांनी दिलासाशी बोलतांना म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नवीन महत्वाकांक्षी नागपूर-गोवा महामार्ग बांधणीचे काम लवकरच सुरू होईल. हे नमूद करताना आनंद वाटतो की, आपल्या जिल्ह्यातील संत जनाबाई यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र गंगाखेड येथून हा महामार्ग जाणार आहे. आज पर्यंतच्या भेदभावाच्या धोरणामुळे परभणी जिल्हा रस्ते व दळणवळण विषयक बाबींमध्ये नेहमीच मागे राहिला. मात्र आता हा अन्याय दूर झाल्याचे समाधान आहे, असेही त्या दिलासाशी बोलतांना म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री फडणवीस यांच्या अभ्यासू नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा पंचामृत अर्थसंकल्प जाहीर झाला. ‘शाश्वत शेती, समृद्ध शेती’ हे पहिलंच सूत्र या बजेटमध्ये असल्याने शेतकर्यांसाठी अनेक क्रांतिकारी घोषणा यावेळी केल्या. यापूर्वी शेतकर्यांना ‘किसान सन्मान’ योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी 6 हजार रुपये मिळण्याची तरतूद होती. महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांच्या कष्टांना ताकद देत त्यात आणखी 6 हजार रुपयांची भर घालत महत्त्वपूर्ण अशा ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची घोषणा केली. आता या शेतकर्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये मिळतील, असेही नमूद केले.
चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची घोषणा करत महिला सक्षमीकरणासाठी यावेळच्या अर्थसंकल्पात राज्याच्या अर्थ मंत्रालयाने अक्षरशः प्राण ओतले. महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण असेल, महिलांच्या स्वयंरोजगाराच्या बाबतीतील योजना असतील, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट योजना, मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ सारखी अभिनव योजना या सर्वच बाबतीत महिलांना नवी शक्ती देण्याचे काम राज्य सरकारने आपल्या पंचामृत अर्थसंकल्पात केले.
मराठा समाजासह अठरा पगड जातींच्या आर्थिक उत्थानासाठी त्या त्या समाजाच्या संस्थांना राज्य सरकारने घोषित केलेला भरीव निधी राज्यातील ‘अंत्योदया’चे महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनांसाठी अभ्यासपूर्वक तयार केलेल्या निधी वाटपा संदर्भात राज्य सरकार मार्फत त्या काळात नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाईल, ही या सर्वच समाजातील नागरिकांसाठी आर्थिक स्वातंत्र्य घोषित करणारी बाब आहे, असे त्या म्हणाल्या.
मागील अनेक दिवसांपासून आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू होतं. त्यांच्या हाकेला साद घालत राज्य सरकारने या अर्थसंकल्पात त्यांच्या मानधनात भरीव वाढ केली. आशा स्वयंसेविकांचे मानधन आता 3500 वरून 5000 रुपये करण्यात आले आहे, तर गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरून 6200 रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरून 10000 रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200, अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4425 वरून 5500 एवढे वाढविण्यात आले आहे. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या 20000 नवीन पदभरतीची घोषणा करत महिलांसाठीच्या नवीन रोजगार संधीची उपलब्धता यात करण्यात आली आहे. या अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठीच्या विशेष साखळी व्यवस्थापन प्रणालीची यावेळी घोषणा झाली, असेही आमदार सौ. बोर्डीकर यांनी दिलासाशी बोलतांना म्हटले.
‘वारकरी मानधन योजना’ लागू करत सरकारने आयुष्यभर पांडुरंगाची सेवा करत समाजप्रबोधन करणार्या माझ्या वारकरी बांधवांना मोठी भेट दिली आहे. तसेच श्रीचक्रधर स्वामींच्या 800 व्या जयंती वर्षा निमित्त महानुभाव पंथाच्या पवित्र तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे महानुभाव पंथीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणार्या श्रीक्षेत्र ऋद्धपुर मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा या निमित्ताने करण्यात आली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असणार्या या दोन पंथांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून आले, असे त्या म्हणाल्या.
मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यासाठी मोठ्या योजनांची घोषणा करत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या आज पर्यंतच्या प्रादेशिक भेदभावाच्या राजकारणाला छेद दिला आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीला नवी भरारी देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे. अशा शाश्वत विचारांच्या आणि दूरदृष्टीपूर्वक बनवण्यात आलेल्या राज्याच्या पंचामृत अर्थसंकल्पाचं आणि त्यात मातृत्व ओतलेल्या इच्छाशक्तीचं आपण मनापासून स्वागत करतो, असेही म्हटले.
महाराष्ट्राला 1 ट्रीलीयन इकॉनॉमी बनवण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला यामुळे नवे पंख फुटले आहेत. राज्य सरकार व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अथक परिश्रम आणि अभ्यासू नेतृत्वामुळे येत्या काळात महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प ‘सुवर्ण संकल्प’ म्हणून ओळखला जाईल, याची आपणास खात्री आहे, असा विश्वासही आमदार सौ. बोर्डीकर यांनी व्यक्त केला.