Uncategorized
अपहरण प्रकरणात आणखीन चौघे जेरबंद पोलिस दलाची कामगिरी : तपास सुरुच
परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यामध्ये पैशाकरीता लहान मुलांचे अपहरण करुन मुलांना विकणारी आंतरराज्य टोळी परभणी जिल्हा पोलिस दलाने गेल्या आठवड्यात ताब्यात घेतली. या टोळीने दिलेल्या माहितीच्या आधारेच पोलिस दलाने या प्रकरणात आणखीन चार आरोपींना जेरबंद केले असून त्यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. दरम्यान, या चौघांकडून दोन बालकांना पोलिसांनी शोध लावून ताब्यात घेतले असून बालकल्याण समितीकडे या बालकांना सुपूर्त करण्यात आले आहे.
याप्रकरणात यापूर्वी दहा आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. त्यापैकी आठ आरोपी परभणीतील होते. पोलिस पथकाने या प्रकरणात पुढे तपास करीत रुद्रेश हरिश्चंद्र वारंग (रा. ठाणे), सुमन पुडी लक्ष्मी दुर्गा (रा. कोकाडपल्ली हैद्राबाद), सिलमप्रभा अनिल (रा. भद्रादी कोथागुडेम) इटी त्रिनाथ व्यंकटराव (रा. विजयवाडा) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्यात मौहम्मद युसूफ मोहम्मद हैदर (रा. अजमेर कॉलनी) यांनी त्यांचे 4 वर्ष 3 महिने वय असलेल्या मुलाचे अपहरण अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने केले असावे, अशी तक्रार 6 फेबु्रवारी 2022 रोजी दिली होती. त्याआधारे गुन्हा दाखल झाला होता. तसेच कोतवाली पोलिस ठाण्यात सफिया बेगम अर्शद खान या राजस्थानमधील एका महिनेने त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाचे कोण्या अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे, अशी तक्रार 1 मार्च 2022 रोजी दिली होती. हे दोन्ही गुन्हे अनैतिक मानवी तस्करी विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आले. पाठोपाठ पोलिस उपनिरीक्षक आर.जी. भावसार, पोलिस अंमलदार शेख शकील अहेमद, किरडे, शिरसकर व शेळके यांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला.
बालकांच्या बाबत माहिती गोळा केली. सतत एक महिना गोपनियरीत्या पाळत ठेवली. तपासामध्ये दोन्ही गुन्ह्यातील बालकाचे अपहरण हे अजमेरी कॉलनीतील राहणारी महिला सुलताना उर्फ परवनी बी शेख सादेक अन्सारी हीने केल्याचे तपसातून निष्पन्न झाले. तीला मदत करणारी तीची बहिण नूरजहाँ बेगम मोहम्म इब्राहिम शाकेर व तीचा विधीसंघर्ष बालक यास शिताफीने ताब्यात घेवून पोलिसांनी सखोल चौकशीतून पुढील माहिती काढली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पालमचे पो. नि. प्रदीप काकडे, सिबर्चे पो. नि. संजय करनुर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवप्रसाद मुळे, मारुती करवर, श्रीमती कल्पना राठोड, जी. टी. बाचेवाड पोउपनि श्रीमती राधीका भावसार, साईनाथ पुयड, मारुती चव्हाण, व्यंकट कुसमे, नागनाथ तुकडे, शकील अहेमद, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, स्वप्नील पोतदार तसेच पो. मु. क्यु. आर. टी, कोतवाली, पालम, नवा मोंढा, एएचटी युनिटचे अंमलदार, स्था.गु.शा. चे अंमलदार, सायबर पो.स्टे. चे सर्व अंमलदार यांनी या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली.