जिला
तीन वर्षापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी हिमायतनगर शहरवासीयांच्या तासभर रस्ता रोकुन धरणे आंदोलन दीड तास वाहतूक झाली होती ठप्प; नायब तहसीलदाराने स्वीकारले निवेदन
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासून ठप्प आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना व वाहनधारकांना पावसाळ्यात चिखलाचा तर उन्हाळ्यात धुळीचा सामना करावा लागत आहे. या अर्धवट रस्त्यामुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. गुत्तेदाराच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या हिमायतनगर शहरवासीयांनी बुधवार दि.०१ रोजी तासभर रस्ता रोकुन धरत परमेश्वर मंदिर कमानीजवळ धरणे आंदोलन उभारले आहे. यामुळे तब्बल दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांच्या नाके नऊ आल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. दुपारी १२.३० वाजता नायब तहसीलदार विकास राठोड यांनी भेट देऊन शहरवासीयांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. तर ठेकेदार यांनी उपस्थित होऊन लवकरच काम सुरू करू असे सांगितले. मात्र जोपर्यंत रस्त्याचे रखडलेल्या काम सुरू होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू राहील असा पवित्रा शहरवाशी नागरिकांनी घेतला आहे.
हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६१ चे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. तीन वर्षापासुन रखडत सुरु असलेल्या कामात मुख्यत्वे शहरातील श्री परमेश्वर मंदिर मुख्य कमान पासून ते रेल्वे गेट पर्यंत रस्ता अपूर्ण ठेवण्यात आला आहे. सदरील रस्ता हा पूर्णपणे खोदकाम न करता डांबरीकरणाचे काम जैसे थे ठेऊन रस्ता तयार करण्यात आला. लगेच त्यावर डस्ट व गिट्टी मिश्रण टाकून लेव्हल करण्यात आले आहे. त्यामुळे आजघडीला जडवाहाने जाऊन सदरील रस्त्यावरील डस्ट गिट्टी उघडी पडली असून, परिणामी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डस्ट तथा धुळीमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यासह नागरिकांना आरोग्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे वैतागलेल्या हिमायतनगर शहरातील नागरिकांनी रस्ता कामात भाईगिरी करणाऱ्या ठेकदाराच्या विरोधात आजपासून जनआंदोलन सुरु केले आहे.
हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुनिल हायटेक कंपनीच्या नांवे देवुन पुढे कृष्णानंद इन्फ्रा या कंपनीस दिलेले आहे. तीन वर्षाच्या काळात सदर कंत्राटदाराने नियमाप्रमाणे काम केले तर नाहीच त्या शिवाय रस्त्याची उंची, रुंदी कमी केली आहे. त्याच बरोबर संबंधित रस्ता कडक मुरुमापर्यंत खोदकाम न करता वरच्यावर जुन्या डांबरी रस्त्यावर मटेरियल टाकुन दबाई करुन थातुर – मातुर काम करण्यांचा सपाटा संबंधित गुत्तेदारांनी चालविला आहे. त्यास संबंधित विभागाचे अभियंत्यांची मुक संमती दिसत असल्याने योग्य तंज्ञाकडुन मुल्याकन होणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाच्या जोडरस्ते प्रकल्पास बगल देवुन, भारतीय दळण वळणाची प्रक्रिया वाढवुन सक्षम भारत करण्यांच्या दृष्टीकोणतुन हिमायतनगर रेल्वे गेटवर उड्डाणपुल प्रस्तावीत आहे तो होणार यात तीळमात्र शंका नाही. राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या कमानी पासुन जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुल प्रस्तावीत होता, परंतु येथील काही भुमाफीयांनी हेतुपुरस्परणणे स्वत:च्या जमिनीचे मुल्य कमी होवू नये म्हणुन उड्डाणपुल रद्द करण्यांचा घाट काही राजकीय प्रस्थापित लोकांना धरून घातला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या कामाच्या विरीधात शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सर्वसामान्य जनता आक्रमक झाली आहे. रस्त्याचे काम सुरु करेपर्यंत धरणे आंदोलन करुन रास्ता रोको आंदोलन छेडण्यांत येणार असल्याने निवेदन आठ दिवसापूर्वी देण्यात आले होते. मात्र संबंधीत विभागाने याची नोंद घेतली नसल्याने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, वाहनधारक जनतेने आज सकाळपासून आंदोलनाला सुरूवात केली होती.
हिमायतनगर शहर व परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने सोहळ मीडियावर हिमायतनगर शहराचे नामकरण हे धुळीच शहर म्हणून संबोधित केले जाते आहे. त्यामुळे आज रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरु करण्यासाठी पोलिसांना नाकेनऊ येत होते. हि बाब लक्षात आल्यानंतर हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार बांधवाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी चक्क वाहनांना धक्का मारला, त्यामुळे अनेकांनी पत्रकार बांधवांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.