जिला

पाणी तुटीमुळे यवतमाळ, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात अपेक्षित सिंचन नाही!: अशोक चव्हाण

 

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत ७८१ दलघमी पाणी तूट उपमुख्यमंत्र्यांची कबुली; पर्यायी उपायांचे आश्वासन

नांदेडदि. २८ फेब्रुवारी २०२३:

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वापराच्या नियमबाह्य परवानग्या दिल्यामुळे तूट निर्माण होऊन यवतमाळ, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात अपेक्षित सिंचन होत नसल्याचा मुद्दा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना या प्रकल्पात ७८१ दलघमी तूट असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले असून, दिगडी उच्च पातळी बंधारा, खरबी बंधारा व गोजेगाव चिंचोली उपसा सिंचन योजनेतून ही तूट भरून काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या विषयावर मंगळवारी दुपारी लक्षवेधी प्रस्तावावर झालेल्या चर्चेत अशोक चव्हाण म्हणाले की, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील पाणी तुटीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ११ हजार २६५ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात १२ हजार ३७२ हेक्टर तर नांदेड जिल्ह्यात ५२ हजार ०५७ हेक्टर असे एकूण ७५ हजार ६९४ हेक्टर सिंचन क्षेत्र बाधित होणार आहे. पाणी तुटीमुळे या तीन जिल्ह्यात सिंचन क्षेत्र घटल्याने सिंचनाचा अनुशेष अधिक वाढण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.

१९६८ च्या मूळ आराखड्याप्रमाणे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची निर्धारित सिंचन क्षमता १ लाख २५ हजार १२६ हेक्टर होती. मात्र १९८२ ला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंचनाखाली येणारे क्षेत्र १ लाख ७ हजार ९० हेक्टर पर्यंत मर्यादित करण्यात आले. प्रत्यक्षात आजमितीस या प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्यातून केवळ ३१ हजार ३९६ हेक्टर एवढेच सिंचन केले जाऊ शकते, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.

‘वाल्मी’च्या २००८ च्या अहवालानुसार यापुढे ईसापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात भविष्यकालीन योजनांसाठी पाणी आरक्षित करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तरीही पाणी वापरासाठी परवानगी का दिली जाते, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. सापळी धरण न झाल्यामुळे तेलंगणाकडे वाहून जाणाऱ्या १९९ दलघमी पाण्याचे नियोजन करून पर्यायी उपाययोजना गतीमानतेने अंमलात आणावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तूट भरून काढण्याच्या आश्वासनासोबतच यापुढे सदर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वापराची अधिक परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तीन जिल्ह्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सिमेवरील दिगडी उच्च पातळी बंधारा (५८२ दलघमी), हिंगोली जिल्ह्यातील खरबी बंधारा (१०२ दलघमी) आणि नांदेड जिल्ह्यातील गोजेगाव चिंचोली उपसा सिंचन योजना (९७ दलघमी) या तीन योजनेतून पाणी उपलब्ध करण्याच्या उपाययोजनेला मान्यता दिली जाईल. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे क्षतीग्रस्त कालवे व बांधकामांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती दुरुस्तीची कामे केली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, आ. मोहन हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर आणि आ. राजेश पवार यांनीही आपली मते मांडली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button