मराठवाडा
शिक्षकांच्या बदल्या रद्द करा म्हणून जलसमाधी आंदोलन
मानवत,(जिल्हा परभणी प्रतिनिधी) : तालुक्यातील इरळद येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या तातडीने रद्द कराव्यात, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दुधना नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला.
या शाळेतील शिक्षकांच्या बदल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होईल, असे स्पष्ट करीत संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकांच्या बदल्या थांबाव्यात, यासाठी दुधना नदीचे पात्र गाठले अन् प्रशासनाशी संपर्क साधून जलसमाधीचा इशारा दिला. या संतप्त ग्रामस्थांनी एकाच वेळी सहा शिक्षकांच्या बदल्यांचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठे गंडांतर होय, असे स्पष्ट मत नोंदवून वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, अन्यथा यापुढे प्रखर आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनामुळे शिक्षण विभागातील अधिकारी चांगलेच हादरले होते. काहींनी तातडीने संपर्क साधून या प्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात गावचे सरपंच, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.