‘तर एवढा विषय झाला नसता.’, सत्यजीत तांबेंच्या ‘त्या’ आरोपांवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले असून, 2 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल जायीर करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली.
तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही सत्यजित तांबे यांनी मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला आहे.
दरम्यान, या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी ते म्हणाले, “मी सुरुवातीपासून पक्षाकडे पद किंवा काही तरी जबाबदारी मागितली. मात्र मला पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितलं की तुम्ही वडिलांच्या जागी प्रयत्न करा. त्यानंतर कार्यकर्त्यांचा रेटा पाहून वडिलांनीच माघार घ्यायचं ठरवलं. त्यानुसार मी अर्ज सादर भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी यावेळी केला.
दरम्यान, आता सत्यजित तांबेंच्या या आरोपांवर माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. एका सिद्ध वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “सत्यजीत तांबेंना काँग्रेस पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रश्न येतो कुठं. तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून लढायचं होतं, तर कोणी नाकारलं होतं.
डॉ. सुधीर तांबे हे विद्यमान आमदार होते. वडिलांच्या जागी मला उमेदवारी द्या, म्हटलं असतं कोणीच विरोध केला नसता. पण, पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबेंच्या नावाला संमती दिल्यावर, अचानक उमेदवारी मागणं हा बदल शक्य नाही. त्यामुळे सुरुवातीलाच उमेदवारी मागितली असती, तर विषय झाला नसता”. असं विधान अशोक चव्हाण यांनी यावेळी केलं.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. पण त्यांचा पराभव झाला.