जिला

गावठानच्या जागेवर वास्तव्य राहून मालकी हक्क प्रमाणपत्रापासन वंचित नागरिकांच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी याना निवेदन सादर

 

शासनाच्या विरोधात दिनांक १६ रोजी बेमुदत थाळी नाद आंदोलन करण्याचा इशारा
कोपराला गूळ लावून ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांना निवडणुकीत परिणाम भोगावा लागणार

हिमायतनगर,अनिल मादसवार| गेल्या ७० वर्षांपासून गावठानच्या जागेवर वास्तव्य करून ग्रामपंचायत व नगरपंचायतीला कर भरणाऱ्या गोर गरीब नागरिक नमुना नंबर ४३ मालकी हक्क प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र चालविले जात आहेत. परिणामी रहिवाश्याना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ मिळण्यास देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. या समस्येला वैतागलेल्या नागरिकांनी महिनाभरापासून आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र ज्यांच्या मतावर आपण निवडून आलो अश्याच नागरिकांना न्याय मिळवून देण्यास आमदार महोदयांनी केवळ आश्वासन देण्याव्यतिरिक्त कोणतेही प्रयत्न केले नाही. केवळ आश्वासनाची खैरात देत कोपराला गूळ लावून ठेवलं जात असल्याचा आरोप करत वंचित नागरिकांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तहसीलदार अध्यक्ष असलेल्या श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट समोर शासनाच्या विरोधात दिनांक १६ रोजी बेमुदत थाळी नाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहराच्या काठावर असेलेल्या गावठानच्या जागेवर शेकडोहून अधिक गोर गरीब नागरिक ७० वर्षांपासून भाडेतत्वावर वास्तव्य करत आहेत. जेव्हापासून हे नागरिक येथे राहतात तेंव्हापासून तत्कालीन ग्रामपंचायत आणि आत्ताच्या नगरपंचायतीने कर वसूल केला आहे. परंतु आत्तापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी या गोर गरिबांचा प्रश्न सोडविण्यासाठी अथवा मालकी हक्काचे नमुना नंबर ४३ प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कुठलेच प्रयत्न केले नाही. केवळ निवडणूक आल्या की आश्वासनाची खरात द्यायची आणि पुन्हा कोपराला गूळ लावायचा असेच चालू आहे. त्यामुळे मालकी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो वंचित महिला – पुरुष नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

गेल्या पाच वर्षापासून नमुना नंबर ४३ मिळून देतो म्हणून विद्यमान लोकप्रतिनिधींनी गोर गरीब जनतेची दिशाभूल केली. आणि निवडून आल्यावर पाच वर्ष झाले मात्र दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे आम्हाला आता कोणत्या नेत्यावर भरोसा राहिला नाही. जोपर्यंत आमच्या घराच्या मालकी हक्काचा नमुना नंबर ४३ चा पुरावा प्रमाणपत्र म्हणून दिले जात नाही. तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु राहील असा इशारा देऊन गेल्या महिन्यात नगरपंचायतीसमोर उन्हातान्हात सतत सात दिवस हजारो महिलांनी आंदोलन केले. सात दिवसाच्या आंदोलला गावात येऊन गेलेल्या राजकीय नेत्यांना भेट ज्ञेयासाठी वेळ मिळाला नाही. आंदोलन सुरु असताना तीन वेळा काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई चव्हाण यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच कॉम्रेड उज्वला पडेलवार यांनी या आंदोलनात दाखल होऊन सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या काळात नागरिकांना मालकी हक्काच्या प्रमाणपत्रासाठी सात सात दिवस आंदोलन करावे लागते अशी शोकांतिका व्यक्त केली होती त्यावेळी लोकप्रतिनिधींना मान खाली घालून जावं लागलं होत.

नगरपंचायतीने काही मजुरांना जॉब कार्डचे वितरण करून अन्य मागण्या लवकरच सोडवू असे लेखी आश्वासन दिले होते. १५ दिवसाचा कालावधी लोटला मटार आंदोलन कर्त्याचे समाधान झाले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्याच्या एका शिष्टमंडळाने येणाऱ्या 16 तारखेपासून तहसीलदार अध्यक्ष असलेल्या श्री परमेश्वर मंदिरासमोर थाळी नाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा दिल्यानंतर नगरपंचायतीने सत्ताधारी लोकप्रतिनिधींना बोलावून बैठक घेतली. मात्र हि बैठक फेल ठरल्याने दिनांक १४ रोजी आंदोलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने कॉम्रेड तथा सिटूचे जिल्हा सेक्रेटरी गंगाधर गायकवाड, सिटू राज्य सचिव कॉम्रेड उज्वला पडलवार, लोक विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड दिगंबर काळे, हिमायतनगर कॉम गणेश रचेवाड, नवीन कुमार मादसवार, गंगाधर गायके यांनी डेप्युटी कलेक्टर महेश वडदकर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नावाने आंदोलन करणार असल्याचे पत्र दिले आहे.

दिनांक १६/१०/२०२४ रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर बेमुदत थाळी नाद आंदोलन करण्यापूर्वी ७० वर्षपाऊसन प्रतीक्षेत असलेल्या गावठांमधील राहवाशी याना नमुना नंबर ४३ हे मालकी प्रमाणपत्र द्यावे, रोजगार हमी योजनाचे काम आणि जॉब कार्डाचे वाटप करून योजनेला लोकाभिमुख करून यंत्राने कामे करणे बंद करा, शेती क्षेत्रात पेरणी ते कापणी रोजगार हामी योजने मार्फत कामे काढा. वस्ती वाढ योजने अंतर्गत बे घराचा सर्वे करा त्यांना जागा व घरकुलाचा लाभ द्या. निराधार योजना तील व ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्या जाचक अटी, शर्ती रद्द करून हिमायतनगर शहर व तालुक्यातील हजारो निराधार व वृध्द भुमिहीन दिव्यांग परीतकत्या घटस्पोटीत महिला यांना आनुदान मिळण्यासाठी (२१००० हजार मुळ व शेती) ह्या अटीमुळे आपात्र केले जाते. या जाचक अटी रद करा व लाडक्या बहिण योजनेच्या अटी शर्ती अनुसार आनुदास पात्र करा. महागाई निर्देशनानुसार ६००० हजार रूपये वाढ करा व महिण्याच्या ७ तारखेला अनुदान वाटप करा.

वय वर्ष ६० असण्याऱ्या प्रत्येक लाभात्यास १०००० हजार रूपये पेंशन था व त्यांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विसावा केंद्र उभारा, स्वस्त धान्य योजने मधील ए. पी.एल. व शेतकरी लाभ धारक कार्डावर पुर्वी प्रमाणे धान्या वाटप करा. शिदा किट व पैसे वाटप करणे बंद करा, पैसे नको धान्य तांदुळ, गहू द्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आनंदच झाला मात्र पट संख्येच्या नावाखाली मराठी प्राथमिक शाळा बंद करण्याचा सपाटा सुरू आहे. प्राथमिक शाळा नगरपंचायत विभागा कडुन चालविण्यात याव्यात. गोर गरिब मराठी मुलांना शिकण्याचा अधिकार द्या. हिमायतनगर येथे एम.आय. डी.सी. औधोगिक वसाहत निर्माण करा व तरूणाना रोजगार द्या. सन २०२३ मध्ये ई. पेरा व पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्याना सरसगट ५००० हजार रूपये द्या. महसुलच्या तलाठ्या कडुन शेतकऱ्याच्या सात बारावर पुर्वी प्रमाणे पेरे मांडून द्या. सन २०२३-२४ मध्ये अतिवृष्टी झाली महसुल विभागाने आनेवारी फुगुन दाखवली ती ५० च्या खाली आना व ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी करा व शेतीमालाला हमी भावाने सरकारी खरेदी केंद्र सुरू करा. अश्या मागण्या घेऊन लोकविकास समन्वय संघर्ष समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सी.टु) कामगार संघटना दिनांक १६ रोजी श्री परमेश्वर मंदिरासमोर होणारे आंदोलन अधिक तीव्र करेल असेही निवेदनात म्हंटले आहे.

न्याय हक्कासाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात – कॉम्रेड दिगंबर काळे
नमुना नंबर ४३ मिळत नसल्याने मंजूर झालेल्या घरकुलाच्या लाभापासून गोरगरीब मजुरदाराना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायतीत मागील पंचवार्षिक काळा पासून चालत असलेल्या ढिसाळ कारभार व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यास कारणीभूत आहे. जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यन्त आमचे पुढील आंदोलन चालू राहील तर कोपराला गूळ लावून ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांना निवडणुकीत याचे परिणाम भोगावा लागतील या तयारीत आम्ही आहोत. प्रसंगी न्याय हक्कासाठी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचार करण्यास देखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही अशी संतापजनक प्रतिक्रिया नांदेड येथे निवेदन दिल्यानंतर कॉम्रेड दिगंबर काळे यांनी माध्यमांना दिली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button