हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी गावचा रस्ता रखडला; ग्रामस्थांनी रस्त्यावर बेशरमाचे झाडे लावून लोकप्रतिनिधींचा केला निषेध
हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था; प्रशासकीय यंत्रना मूग गिळून गप्प
हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर शहरापासून पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली जाणाऱ्या अर्धवट रस्त्याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने अखेर भर पावसाळ्यात रस्त्यावर सोलींग गिट्टी अंथरण्याचे काम सुरू करून पुन्हा बंद केले आहे.त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर पुन्हा एकदा चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रकाराला संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यावरील पुलानाजीक बेश्रमाची झाडे लावून ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध करून रस्ता नाही झाला तर लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करून प्रसंगी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 7 कोटीच्या जवळपास विकास निधी मंजूर झाला. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ संपला मात्र या रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने सुरू आहे. औरंगाबाद स्थित सिद्दीकी या ठेकेदाराने या कामाचे बारा वाजविले आहेत. कामाचा अवधी संपुष्टात येवून ही काम पुर्णत्वास आले नाही. ठेकेदाराने या विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता व तसेच कार्यकारी अभियंत्याला मॅनेज करून सुधारीत मूल्यांकन करून निधी उचल करून रस्त्याचे काम अर्धवट सोडून गेला आहे.
रस्ता कामाची गुणवत्ता अतिशय खराब असून, रस्त्याचे व पुलाचे कामाची अवस्था सुमार दर्जाची असल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत असल्याचे वृत्त वर्तमान पत्रात छापून आल्यानंतर ठेकेदाराकडून परवाच या अंतर्गत रस्त्याचे काम हिमायतनगर कडून सुरूवात झाले. यावेळी पहिल्या उखडलेल्या रस्त्यावर सोलींग अंथरून त्यावर मुरूमाच्या नावाखाली माती टाकण्याचे काम सुरू करून पुन्हा रस्त्याचं काम अर्धवट सोडून दिले आहे. गेल्या आठ दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात पाऊस पडल्यानंतर या अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
या कामाची सुरूवात होण्यासाठी अनेकानी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली मात्र पुन्हा ठेकेदाराने अर्धवट काम सोडुन पलायन केल्याने हिमायतनगर सिरपल्ली बोगस व निकृष्ट दर्जाच्या अर्धवट कामासाठी आमदार खासदार बयांची उदासीनता दिसुन येत असल्याचे सांगून राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणा चा निषेध करत येथील गावकऱ्यांनी रस्त्यावर बेश्रमाची झाडे लाऊन आगामी काळात त्यांना गावबंदी करून प्रसंगी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
हा रस्ता पुर्ण झाल्यानंतर किमान १५ वर्ष तरी या रस्त्याच्या कामांसाठी शासनाकडून कवडीचा ही निधी मिळणार नाही. याची ही भीती सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत. ठेकेदार मात्र मनमानी पद्धतीने काम पुर्ण करण्यासाठी टाळाटाळ करीत असून, मायेच्या लालसेपोटी प्रशासकीय यंत्रनेचा व राजकीय नेत्यांचा या बोगस व निकृष्ट कामाला छुपा पाठींबा मिळत असल्यामुळे की, काय? सर्व काही प्रकार अलबेल असाच चालू आहे. कार्यकारी अभियंता व तसेच अधिक्षक अभियंत्यानी या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांकडे जातीने लक्ष पुरवून अंदाज पत्रकानुसारच काम दर्जात्मक आणि तातडीने पुर्णत्वास न्यावे. अशी मागणी स्थानिक हिमायतनगर सह पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या भागातील नागरिकांनी केली आहे. या अंतर्गत रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करावे. या मागणी साठी आम्ही लाक्षणिक उपोषण केले होते. तेव्हा ठेकेदार व प्रशासकीय यंत्रनने या रस्त्याची फारशी दखल घेतली नव्हती.