बालीका पंचायत उपक्रमात उत्कृष्ट कामगीरी करणा-या ग्रामपंचायतींचा गौरव
नांदेड,19 जून- महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांची प्रेरणादायी काम हे आपणासाठी ऊर्जा असून गाव पातळीवर बालिका पंचायतच्या माध्यमातून गावागावात महिला सशक्तीकरणाचे पाऊल पुढे पडत आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या युवतींचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
नांदेड जिल्हा परिषद राबवत असलेल्या बालीका पंचायत या नाविन्यपूर्ण उपक्रमात उत्कृष्ट कामगीरी केलेल्या बालीका पंचायत पुरस्कार सोहळा आज मंगळवार दिनांक 18 जून रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन झाला, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बालिका पंचायत सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार आदींची मंचावर उपस्थित होती.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, प्रत्येक मुलीला शिक्षण मिळाले पाहिजे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेवून त्यांना सुविधा देण्याची जाबाबदारी ग्रामपंचायती आहे. समाजातील मुलगा-मुलगी हा भेद थांबला पाहिजे. मुलींचे सर्व क्षेत्रात सक्षमीकरण हाच या बालीका पंचायतचा हेतू असल्याचे त्या म्हणाल्या. प्रारंभी राजमाता जिजाऊ व वीरांगना अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
जिल्हयात 1 फेब्रुवारी 2024 रोजी बालीका पंचायत या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरवात करण्यात आली. चार महिन्याच्या कालावधीत सहभागी ग्रामपंचयतींनी राबवलेल्या उपक्रमाच्या आधारे उत्कृष्ट काम करणा-या जिल्हयातील पाच ग्रामपंचायतींचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व बुके देवून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात प्रथम ग्रामपंचायत येरगी ता. देगलूर, व्दितीय आमगव्हाण ता. हदगाव तर तृतीय सावरगाव माळ ता हदगाव ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. विष्णूपूरी ता. नांदेड व मालेगाव ता. अर्धापूर या पंचायतींना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. या उपक्रमामुळे आमच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक समस्यांवर काम करण्याची प्रेरणा मिळत असल्यांचे बालीका पंचयतच्या मुलींनी सांगीतले. बालीका पंचायतने ठरविलेल्या उपक्रम, घेण्यात आलेले ठराव व अंमलबजावणी यावर पुढील पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीयसहाय्य शुभम तेलेवार, विस्तार अधिकारी सुधीर सोनवणे, पातेवार, संबंधीत गावचे सरपंच, जिल्हयातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, बालीका पंचायतच्या सदस्या आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती.