बार्शीजवळील घटना खड्डा चुकविताना एसटी बस पलटी; ३७ प्रवासी जखमी,
सोलापूर : खराब रस्त्यावरून जाणारी एसटी बस खड्डा चुकविताना पलटी झाली. या अपघातात ३७ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुर्डी-मालवंडी गावाजवळील महावितरणच्या उपकेंद्रासमोर घडली.
या घटनेत एसटी बससह महावितरणच्या विद्युत पोल, तारांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, एमएच १४ बीटी ११९२ ही एसटी बस कुर्डूवाडीहून वैरागकडे येत होती. या एसटी बसमधून ३७ प्रवासी प्रवास करीत होते. यात शालेय विद्यार्थी व ज्येष्ठांचाही समावेश होता. सुर्डी-मालवंडी गावाजवळील खराब रस्त्यावर पडलेल्या मोठमोठया खड्ड्यातून प्रवास करताना अचानक एसटी बस पलटी झाली. यात ३७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळावर आले असल्याचे सांगण्यात आले. बार्शी तालुक्यातील अनेक मार्ग खराब झाल्याने वाहनधारकांवर प्रवास धोकादायक होत आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे अनेकांनी सांगितले.