अब्दुल सत्तारांना डब्बल धक्का, थेट CBI आणि ED कडे तक्रार दाखल
या तक्रारीत 200 शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुरावे दिल्याचा दावा केला आहे. तसंच 28 मुद्द्यांवर सत्तार यांच्या संपत्ती चौकशीची मागणी केली आहे. कथीत गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सव यानंतर शेतकरी जमीन घोटाळ्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झाला आहे. आता सिल्लोडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे सत्तार यांच्याविरोधात सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तसंच ईडीकडेही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कृषिमंत्री सत्तारांचा गायरान जमिनीचा घोळ महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यातील 150 कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप आहे. वाशीम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे.
हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. असे असताना, योगेश खंडारे यांनी गायरान जमिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने ही मागणी फेटाळली.