परभणी परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी १०० कोटींचा निधी, मराठवाड्यात रेल्वेचा वेग वाढणार
परभणी :मराठवाड्यातील परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळाली. या मार्गाचे विद्युतीकरण काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर दुहेरीकरणाला हिरवा कंदील मिळाल्याने नागरिक, प्रवासी आणि परभणी-बीड या दोन्ही जिल्हावासियांच्या यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत. या ६४.७१ किलोमीटर अंतराच्या मार्गासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २०२३-२४ मध्ये या संपूर्ण प्रकल्पाच्या समावेश झाल्याने येणाऱ्या काही वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा पल्लवित झाल्या आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागांतर्गत परभणी जंक्शन येते.सध्या या विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी सोबतच परभणी ते जालना या मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. मागील चार ते पाच वर्षांत हे काम टप्प्या टप्प्याने हाती घेण्यात आले. आता मार्चअखेर हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. परभणी येथून परळी मार्गे,लातूर रोड, उदगीर, बिदर, विकाराबाद सोबतच लातूर रोड, लातूर, कुईवाडी, पंढरपूर, मिरज हा मार्ग जोडलेला आहे. पुणे, कोल्हापूर अशा विविध रेल्वे या मार्गे धावतात तर दक्षिण भारतातील विजयवाडा, काकीनाडा, सिकंदराबाद या दैनंदिन, साप्ताहिक रेल्वे सुद्धा परळी मार्गे धावतात.
परभणी-परळी हे ६४. ७१ किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गावरील प्रवाशांची घनता आणि सोबतच धावणाऱ्या दररोजच्या पंधरा रेल्वेशिवाय मालगाड्यांची संख्या लक्षात घेता विद्युतीकरणासह दुहेरीकरणही गरजेचे आहे. त्यामुळे गुरुवारी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नांदेड विभागातील विविध ठिकाणच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण सोबतच बायपास लाईन आणि इतर कामांना मंजुरी मिळाली. त्यात परभणी-परळी दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
७६९.९३ कोटी रुपये एकूण मंजूर खर्च
परभणी-परळी वैद्यनाथ दुहेरीकरण प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये सध्या मंजूर झाले आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत ७६९.९३ कोटी रुपये एवढी आहे. २०२३-२४ मध्ये या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. याबाबतची माहिती नांदेड दमरे विभागाने दिली. शिवाय आगामी काळात विद्युतीकरणाला दुहेरीकरणाची जोड मिळाल्यास या मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.नांदेड विभागातील परभणीपर्यंत दुहेरीकरण झाले आहे. आता परभणी- जालना आणि परभणी-परळी या मार्गाचे काम आगामी काळात होणे अपेक्षित आहे.