मराठवाडा
परभणी येथील तुराबुल हक्क दर्गाचा उर्स साजरा करणे बाबतची बैठक सकारात्मक पार पडली.- डॉ फौजिया खान खासदार
परभणी- देशातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क साहेब यांचा उर्स 1 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतो. या उर्स निमित्ताने वेगवेगळ्या विभागाने करावयाच्या कामाची जबाबदारी तसेच त्याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज दिनांक 22/1/2024 रोजी जिल्हाधिकारी परभणी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीस राज्यसभा सदस्या तथा वक्फ मंडळ सदस्या डॉ फौजिया खान उपस्थित होत्या. बैठकीत प्रामुख्याने पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, मनपा आयुक्त श्रीमती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी श्री शेवाळे, वक्फ मंडळाचे प्रतिनिधी श्री मुशीर, विभागीय वक्फ अधिकारी श्री खुसरो व जिल्हा वक्फ अधिकारी श्री अमिनुजमा हे होते. या व्यतिरिक्त पोलीस विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, फायर ब्रिगेड, सार्वजनिक बांधकाम विभाग, दारूबंदी विभाग, व प्रामुख्याने महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत यावर्षी तुराबुल हक उर्सचे नियोजन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी संबंधितानी प्रस्ताव मांडले.
त्यात सुरुवातीला तुराबुल हक्क उर्साकरिता तयार केलेले नुमाईश व शोलॅड याचे जागेबाबत ताबा देण्यासाठीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी सदरची बाब ही वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 19/1/2024 चे पत्राने निर्णयीत केले असून त्यानुसार ताबा देण्यात येईल असे सांगण्यात आले. यानंतर या उर्सामध्ये सर्व दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आग प्रतिबंधक उपाययोजना ठेवावी. हॉकर्सणी रस्त्यावर फिरू नये याची व्यवस्था करावी. फायर ब्रिगेडची वाहने मध्ये फिरू शकतील असे मोठे रस्ते ठेवावेत. सीसीटीव्ही नाईट व्हर्जन चे व चांगल्या प्रकारचे ठेवावेत. पशुसंवर्धन चे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उर्साचे संदल मध्ये येणाऱ्या उंटाची वैधकिय तपासणी करण्यात यावी. मीना बाजारचे नियोजन योग्यरीत्या करून त्यामध्ये पुरुष मंडळी येणार नाहीत यासाठी व्यवस्थापन करावे. मीना बाजारची प्रसिद्धी अगोदरच करावी असे ठरले. उर्सचे काळात लहान मुले व काही लोकांचे सामान गहाळ होते ते इतरत्र मिळून येते ते एका ठिकाणी प्रदर्शित करून ज्यांचे असेल ते घेऊन जाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे चांगली सुयोग्य अशा प्रकारची व्यवस्था करावी.
लाऊड स्पीकरचा वापर हा रात्री 10 वाजेपर्यंतच अनुज्ञेय असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे. उर्साचे जागेवर स्वच्छता राहण्यासाठी महानगरपालिकेने व्यवस्था करावी. वक्फ कार्यालयाने त्यांचे कर्मचारी ऊर्सच्या काळात 24 तास उपलब्ध राहतील. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागाना ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या त्यानी बिनचूक कराव्यात असे ठरले. त्याच प्रमाणे या उर्सच्या काळात लावण्यात येणारे झुले, दुकाने याचे आगीबाबतचे लेखापरीक्षण तसेच त्याबाबतचे प्रमाणीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभाग यांनी करावे. नुमाइस मधून बाहेर जाण्यासाठी आणि येण्यासाठी आपत्कालीन रस्ता असावा अशा वेगवेगळया सूचना केल्या गेल्या आणि त्यावर कामकाज करण्याचे सभेत ठरले. ज्यास दुकान भाड्याने दिले ते दुसऱ्यास पुन्हा भाड्यावर देऊ नये असे देखील सभेत ठरले. वेगवेगळ्या कामाचे लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी संबंधितांना आदेश दिले आहेत. त्यानुसार त्या त्या विभागाने नेमुन दिलेले काम करावे असे सभेत जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सभेमध्ये उर्सासंबंधीचे आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून योग्यरीत्या नियोजन व काम करण्याच्या सूचना संबंधितांना जिल्हा दंडाधिकारी यांनी दिल्या. तसेच यावर्षी ऊर्सचे काळात चांगले कामकाज करावे असेही त्यांनी सूचित केले. सभेमध्ये गतवर्षी उर्स मध्ये पोलीस बंदोबस्त चांगला दिला त्याबाबत पोलीस अधीक्षक यांचे सर्वांनी अभिनंदन केले. एकंदरीत आजच्या बैठकीत सर्व विभागाने चांगल्या पद्धतीने काम करण्याचे मान्य करून यावर्षीचा उरूस हा सकारात्मक दर्जाने आणि चांगल्या प्रकारचा करण्यात येईल असे नियोजन केले. सभेच्या शेवटी या 117 व्या ऊर्सानिमीत्तचे कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले आणि सभेची सांगता झाली. या सभेमध्ये खासदार डॉ फौजिया खान यांनी सहभाग घेऊन हा ऊर्स चांगल्या प्रकारे होईल यासाठी पुढाकार घेतला. तसेच सर्व विभागांना त्यांनी करावयाचे कामाबाबत डॉ खान यांनी सूचना दिल्या आणि सर्व विभागाने त्या मान्य केल्या. त्यामुळे या वर्षीचा उर्स सर्व अर्थाने चांगला होईल असी आशा पल्लवीत झाली आहे.