जिला
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती
नांदेड, दि. 20 :- रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड शहरातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, नागार्जुना पब्लिक स्कूल, जिल्हा व सत्र न्यायालय, छत्रपती चौक आदी ठिकाणी वाहनचालक, नागरिकांना “नो हॉकिंग” ध्वनी प्रदूषणाला आळा विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी रस्ता सुरक्षेसंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन व माहितीपत्रके वाटप केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक किशोर भोसले, सहायक मोटार वाहन निरीक्षक सचिन मगरे, श्रीमती सायली शंकरवार, सुनिल जारवाल, संजय भोसले, गजानन पवळे, श्रीमती राधा जेलेवाड, दिलीप गडचेलवार आदींनी परिश्रम घेतले.
नांदेड शहरातील डॉक्टरलेन भागातील आदित्य हार्ट क्लिनीक, वेदांता डायग्नोस्टिक आदी ठिकाणी नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषण विषयी जनजागृती केली. वायुवेग पथकातील श्रीमती मंजुषा भोसले, नंदकुमार सावंत, आशिष जाधव यांनी आसना पुलाजवळ कर्कश आवाजात हॉर्न वाजविणाऱ्या 10 वाहनांची तपासणी केली. त्यात 2 वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. तर उर्वरीत वाहनचालकांना थांबवून समुपदेशन करण्यात आले.
नांदेड शहरातील प्रियदर्शन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियान-2024 अंतर्गत रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक, उपस्थित नागरिकांना वॉक ऑन राईट, अपघात होऊ नये यासाठी व अपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजने याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. गुड सेमिरीटन व हेल्मेटयुक्त, अपघातमुक्त गाव संकल्पनेची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबतची माहिती पुस्तिका व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. शाळेजवळील परिसरात ध्वनीप्रदूषण बाबत भित्तीपत्रके / स्टिकर लावण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्षक विजय राठोड, श्रीमती मंजुषा भोसले व सहायक वाहन निरीक्षक सागर गुरव यांनी परिश्रम घेतले.