मराठवाडा
अखेर त्या चार रस्त्यांच्या कामांच्या निविदांना मंजूरी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांची माहिती
परभणी, दि.17(प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीतील सर्वसाधारण 15 किलो मीटर अंतराच्या काही रस्त्यांच्या कामांच्या निविदांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर मंजूरी बहाल केली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर व माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेतून दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालय ते राष्ट्रीय महामार्ग 61 परभणी-जांब-आनंद भोगाव या 3.6 किलो मीटर रस्त्यासह अनुसया टॉकीज ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंतच्या अर्धा किलो मीटर, जायकवाडी कालवा ते खंडोबा बाजार या 1.3 किलो मीटर तसेच राष्ट्रीय महामार्ग 61 ते गायकवाड यांचा मळा जूना पेडगाव रस्ता, महाराणा प्रताप चौक, धाररोड, मरिआई मंदिर, कारेगाव रोड, राष्ट्रीय महामार्ग 61 ते कब्रस्तान, अक्षदा मंगल कार्यालय या रस्त्यांच्या मजबुतीकरणासह डांबरी नूतनीकरण, रस्त्याच्या दुभाजकासह चार पदरी सिसि पेकर शोल्डर नाली, युटिलिटी, पथदिवे, वृक्षारोपन वगैरेच्या 70 कोटी 21 लाख रुपये किमतीच्या कामांना मान्यता बहाल करण्यात आली आहे, असे आमदार वरपुडकर यांनी नमूद केले.
या प्रमुख चार रस्त्यांच्या कामांकरीता एकूण 59 कोटी 70 लाख रुपयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या असून अहमदाबाद येथील मे. सर्जन इन्फ्राकॉम प्रा.लि. या एजन्सीस या कामांच्या निविदा बहाल करण्यात आल्या आहेत. एकूण अंतीम निविदा 4.95 टक्के जादा दराने बहाल करण्यात आल्या असून अंतीम देयकाची किंमत 62 कोटी 9 लाख 81 हजार 996 इतकी आहे.
दरम्यान, या कामांसंदर्भात या खात्याच्या अव्वर सचिव ललितागौरी गिरीबुवा यांनी अटी व शर्थी नुसार सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडच्या प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना हे काम विहित वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत, अशी माहिती आमदार वरपुडकर व माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी दिली.
दरम्यान, या पत्रकार परिषदेस नदीम इनामदार, पंजाबराव देशमुख, सुनील देशमुख, अमोल जाधव, विनोद कदम, सचिन अंबिलवादे, विखार अहेमद खान, विशाल बुधवंत, नागेश सोनपसारे गुलमीर खान यांच्यासह अन्य उपस्थित होते.