जिला
नांदेड प्लॉगर्सच्या वतीने माळेगाव यात्रेत प्लास्टिकमुक्तीसाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; प्लास्टिक संकलनाचेही काम
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, मीडिया सेंटर,11- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत यंदा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच प्लास्टिकमुक्त यात्रा करण्याचा संकल्प आहे. ही संकल्पना भाविकांच्या मनात रुजवण्यासाठी नांदेड प्लॉगर्सचे 30 ते 40 युवक- युवती माळेगाव यात्रेत जागोजागी पथनाट्याद्वारे जनजागृती करत आहेत.
मंदिर परिसर, घोडेबाजार, कृषी प्रदर्शन, महिला बचत गट स्टॉल, विश्रामगृह, ग्रामपंचायत, पोलीस चौकी, जिल्हा परिषद शाळा व जागोजागी हे युवक पथनाट्याद्वारे जनजागृती करत आहेत.
तसेच प्लास्टिमुक्तीचे संदेश असलेले फलक हातात घेऊन भाविकांशी संवाद साधत आहेत. कापडी पिशवी घरोघरी-पर्यावरणाचे रक्षण करी, प्लास्टिकचा वापर सोडा- पर्यावरणाशी नाते जोडा, नाही झाले जर प्लास्टिक नष्ट-श्वास घेण्यास होईल कष्ट, हिरवी गार पालवी वाढवावी लागेल, प्लास्टिक मुळापासून काढावं लागेल असे फलक लावले आहेत.
या उपक्रमाला भाविकांनी चांगला प्रतिसाद देत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने यात्रेत ठिक-ठिकाणी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या कचऱ्यापेट्यामध्ये भाविक प्लास्टिक व कचरा टाकतांना दिसून आले.
या जनजागृतीमध्ये डॉ. जयवर्धन बलखंदे, इंजी. चंद्रशेखर अय्यर, डॉ. पुष्पा कोकीळ, डॉ. सुधाकर सर , सुयश ढगे, करण हिंगोले, डॉ. आकाश हटकर, अमित अडते, सांची गर्जे, भूषण भुजबळ, माधव सुवर्णकार, रुपाली गोडबोले, श्रद्धा बलखंडे, अदिती ढगे, योगेश शिरुळे, अक्षय धानोरकर, शिवराज वारेवार, आदित्य कदम , प्रदीप कदम, अनिकेत खंडरे, प्रगती कदम, शिवानंद , धम्मा लोणे, साक्षी वाघमारे, आस्था मोरे, प्रज्वल धुमाळ, सृष्टी म्हस्के, अजित बंडे, शुभम सरपाते, प्रशांत खिल्लारे, प्रिया भालेराव, अजय राठोड, अनुष्का ढगे यांचा समावेश आहे.
ग्रामसेवक संघटनेचाही पुढाकार
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोहा तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने पुढाकार घेतला. सर्व ग्रामसेवक काल प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी माळेगावात एकत्र आले होते. मंदिर परिसर, पोलीस चौकी, ग्रामपंचायत, विश्रामगृह व परिसरात प्लास्टिक कचरा गोळा केला. ही मोहीम यात्रा संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेने सांगितले आहे. याशिवाय माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनेही सफाई कर्मचारी लावले आहेत.