महाराष्ट्रा
कोल्हापूर बिनविरोध सडोली दुमाला येथे ग्रा.पं. सदस्याचे डेंग्यूने निधन
सडोली दुमाला (ता. करवीर) येथील नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झालेल्या संग्राम सीताराम गुरव (वय २७) या तरुणाचे डेंग्यूने आज (दि. २७) निधन झाले. संग्रामची आकस्मिक एक्झिट मन हेलावून टाकणारी ठरली आहे. या घटनेने सडोली दुमालासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संग्रामला तीन-चार दिवसांपूर्वी ताप आला होता. गावी उपचार सुरू होते. त्यांना डेंग्यू झाल्याचे तपासणीत कळले. उपचार करूनही प्रकृती नाजूक बनल्याने त्यांना सोमवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डेंग्यूसह काविळीमुळे प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. उपचार सुरु असताना आज संग्रामचे निधन झाले. संग्रामचे निधन झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी फोडलेला टाहो मन हेलावून टाकणारा होता.
सडोली दुमाला ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पाडली. यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. फक्त सरपंचपदासाठी निवडणूक झाली होती. या बिनविरोध सदस्यात प्रभाग क्रं. ३ मधून संग्रामची निवड करण्यात आली होती. मागील पंचवार्षिक निवडणुकीत तो निवडून आला होता. सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून तो काम पाहणार होता. तत्पूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.
वारकरी संप्रदायातील संग्राम गावातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा संग्राम याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे त्याच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगी, आईवडील असा परिवार आहे.