जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर सन 2024-25 चा गाव विकास कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू
नांदेड,29- जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर सन 2024-25 चा गाव विकास कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर आराखड्यामध्ये आरोग्यदायी गाव थीम अंतर्गत अंगणवाडीतील कुपोषित मुला-मुलींना अतिरिक्त आहार पुरवठा करण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्व उत्पादनाच्या 10 टक्के तरतूद ठेवून महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागातील अंगणवाडी कार्यक्षेत्रातील 6 महिने ते 3 वर्ष तसेच 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अंगणवाडी मार्फत आहार दिला जातो. या व्यतिरिक्त कुपोषित मुलांचे कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विशेष आहार म्हणून दही, दूध, पनीर, सोया चंक, चिकन इत्यादी पुरवठा करण्यात यावा. तसेच स्थानिक उपलब्धतेनुसार दूध, सोया दूध, अंडी, फळे, गुळ शेंगदाणे इत्यादी पौष्टिक व प्रथिन युक्त आहार वाटप करण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने सन 2024-25 च्या गाव विकास कृती आराखड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या स्व उत्पादनाच्या दहा टक्के रक्कम सदर उपक्रमावर खर्च करण्याची तरतूद ठेवावी.
गाव विकास कृती आराखड्यात आरोग्यदायी घटकाअंतर्गत पौष्टिक आहार अंगणवाड्यातील मुला-मुलींसाठी पुरवठा करण्याबाबत, ग्रामसभेत मंजुरी घेऊन प्राधान्याने शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुरवठा करण्याबाबत विचार करण्यात यावा. याप्रमाणे प्रचलित नियमानुसार खर्चास मान्यता दिल्यास या योजनेस व खर्चास नियमानुसार मंजुरी ग्रामसभेत घ्यावी. या संदर्भात गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. आराखड्यात तरतूद केल्याप्रमाणे पौष्टिक आहार साहित्य अंगणवाडीला प्राप्त झाल्यानंतर प्राप्त झाल्याची नोंद व ज्या दिवशी ते वाटप करावयाचे आहेत, त्यादिवशी वाटप केल्याबाबतची नोंद स्वतंत्र रजिस्टर करावयाच्या आहेत.
तरी सन 2024-25 च्या गाव विकास कृती आराखड्यात आरोग्यदायी गाव थीम अंतर्गत कुपोषण निर्मूलनासाठी सर्व ग्रामपंचायतीने स्व निधीतून दहा टक्के तरतूद ठेवावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले आहे.