ग्रामीण भागातील 220 गावांमध्ये रथाच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापनासाठी जनजागृती
नांदेड,28- नांदेड जिल्ह्यातील उमरी, मुदखेड, बिलोली व नायगाव तालुक्यातील 220 गावांमधून सांडपाणी व पिण्याचे पाणी व्यवस्थापनासाठी जनजागृती रथ फिरणार आहे. बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या रथास झेंडी दाखवून रथ रवाना केला आहे. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक योगेश जोशी, अमोल खंडागळे, विनोद हल्ले, दिलासाच्या जिल्हा समन्वयक अरुंधती स्वामी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अधीक्षक अल्केश शिरशेटवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
रिलायन्स फाउंडेशन, दिलसा जनविकास प्रतिष्ठान व नांदेड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती रथाचे आयोजन करण्यात आले आहे. हा रथ उमरी, मुदखेड, बिलोली व नायगाव तालुक्यातील 220 गावात सांडपाणी तसेच पिण्याचे पाणी व्यवस्थापनासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधून जनजागृती करणार आहे. सदर जनजागृती रथावर सांडपाणी व्यवस्थापनाचे महत्त्व, सांडपाणी शुद्ध करण्याची पद्धत, प्रक्रिया, शोषखड्डा कसा तयार करावा. पाझर खड्डा, परसबाग, सार्वजनिक शोषखड्डा, स्तरीकरण तळे, वृक्षारोपण तसेच गाव स्तरावर पिण्याच्या पाण्याची घ्यायची काळजी, जल प्रतिज्ञा आदी सचित्र संदेश लावण्यात आले आहेत. उद्घाटन प्रसंगी संदीप मुंगल, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार नंदलाल लोकडे, डी.डी. पवार यांच्यासह रिलायन्स फाउंडेशन व दिलासा जनविकास प्रतिष्ठानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.