जवळगाव व हाडोळी ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून प्रथम पुरस्कार
नांदेड, 11- छत्रपती संभाजीनगर विभागातील सन 2020-21 व 2021-22 वर्षातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील विभागून प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव व भोकर तालुक्यातील हाडोळी ग्रामपंचायतीचा आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीयआयुक्त मधुकर अर्दड यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, सह आयुक्त सीमा जगताप यांची उपस्थिती होती. जवळगाव व हाडोळी ग्राम पंचायतीला विभास्तरीय दहा लाख रुपयाचा विभागून प्रथम पुरस्कार मिळाला. जवळगावच्या सरपंच प्रतिक्षा नितेश पवार, ग्राम विकास अधिकारी शैलेंद्र वडजकर, उप सरपंच सुभाष माने, हाडोळीचे सरपंच प्रतिनिधी माधवराव अमृतवाड, उप सरपंच चेतनकुमार पाटील व ग्राम सेविका सौ. ए.एस. लिंगापुरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. प्रमाणपत्र व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
गाव विकासासाठी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असून नकारात्मक भावना बाजूला सारून चांगुलपणा टिकवून ठेवल्यास गावांचा कायापालट होईल असे, प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर अर्दंड यांनी केले. मूलभूत सुविधेसह सर्व क्षेत्रात सुधारणा झाल्या. परंतु आपण सुधारलेल्यासारखे वागतो का? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यापूर्वी जशी गावे समृद्ध होती. तशीच गावे आपण समृद्ध करून पुढच्या पिढीसाठी समृद्ध गावाचा वारसा द्यावा लागेल असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त विकास सुरेश बेदमुथा यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सह आयुक्त सीमा जगताप यांनी मानले.
या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, केशव बासरकर, सतीश व्हराडे, हरिदास किनेवाड याच्यासह पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 चे पुरस्कार जवळगाव तालुका हिमायतनगर व हाडोळी तालुका भोकर जिल्हा नांदेड विभागून प्रथम पुरस्कार, भडंगवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड व नळगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर विभागून व्दितीय, तर तृतीय पुरस्कार विभागून कंडारी बु तालुका बदनापूर जिल्हा जालना व ब्राह्मणगाव तालुका जिल्हा परभणी यांना देण्यात आला. सांडपाणी व्यवस्थापनासाठी दिला जाणारा स्वर्गीय वसंतराव नाईक विशेष पुरस्कार मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड, पाणी गुणवत्तेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार उमरा तालुका जिल्हा हिंगोली तर शौचालय व्यवस्थापनासाठी दिला जाणारा स्वर्गीय आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार लाडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना प्रधान करण्यात आला.