मराठवाडा
परभणी मार्केट यार्डात मंगळवारपासून कापूस खरेदीस प्रारंभ
परभणी,( परभणी जिल्हा प्रतिनिधी) : परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या टि.एम.सी. मार्केट यार्डात मंगळवार 21 नोव्हेंबर पासून खाजगी व्यापार्यांमार्फत जाहिर लिलावाव्दारे सकाळी 11.00 वाजता कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे. शेतकरी बांधवांनी मार्केट यार्डात कापसाची वाहने आणल्यानंतर ती क्रमवारपणे लावुन जाहिर लिलावाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या बाबतची सौदापट्टी घेऊन संबंधित जिनिंगवर आपली वाहने घेऊन जावीत.
कोणत्याही प्रकारे जिनींग आवारात परस्पर वाहने घेऊन न जाता दुपारी 12.00 वाजेपर्यंत टि.एम.सी. मार्केट यार्डात आणावीत. उशिराने येणार्या वाहनधारकांची निश्चितच गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परभणी बाजार समिती शेतकर्यांचे हितासाठी सदैव तत्पर असुन, शेतकरी बांधवांनी कापुस विक्रीस आणतेवेळी कापुस ओला न आणता स्वच्छ स्वरुपात विक्रीस आणावा. चांगल्या प्रतीचा कापुस हा वेगळा व खराब प्रतीचा कापुस वेगळा करुन आणल्यास बाजार भावाबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नसुन, ज्या योगे कापसास जास्तीत जास्त बाजार भाव मिळेल. सर्व शेतकरी बांधवांनी आपला कापुस परभणी बाजार समितीच्या टि.एम.सी. मार्केट यार्डात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ शंकरराव घुले, उपसभापती अजय माधवराव चव्हाण, सर्व संचालक मंडळ व सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.