खरेदीसाठी स्थानिक दुकानदारांनाच प्राधान्य हवे !
नांदेड: ३ (प्रतिनिधि) फक्त दिवाळीच नव्हे, तर प्रत्येक खरेदी स्थानिक दुकानातून किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांकडून करावी, असे मत जिल्ह्यातील तरुणाई सह अनेकजणांनी व्यक्त केले आहे.
कारण ऑनलाइन कंपन्यांकडून खरेदी केल्यास त्याचा फायदा परदेशी कंपन्यांना होतो. तर, बाहेरून आलेल्या मॉलमध्ये खरेदी केल्यास एकाच कंपनीचा फायदा होतो. आपल्या परिसरातील वेगवेगळ्या दुकानांतून किंवा स्थानिक सुपर मार्केट मधून वस्तू खरेदी केल्यास सर्वांना आनंद मिळेल.
रस्त्यावरील विक्रेता श्रीमंत होण्यासाठी नव्हे, तर पोट भरण्यासाठी विक्री करतो. त्यामुळे त्याच्याकडून साहित्य खरेदी करताना भावासाठी घासाघीस करू नये, अशा भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या. तुमच्या खरेदीमुळे त्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश पसरणार असल्याचे मत अनेक युवक-युवतींनी व्यक्त केले.स्थानिक व्यवसाय सशक्त करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. स्थानिक बाजारपेठ सशक्त झाल्यास राज्य व राष्ट्राचा विकास होऊ शकतो. परदेशी गुंतवणूक असलेल्या मॉलमधील किंवा ऑनलाईन मध्ये आकर्षक दिसणाऱ्या झगमगाटीच्या नादी न लागता स्थानिक बाजारपेठेतच साहित्य खरेदी करून देशाच्या विकासात हातभार लावावा असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे…
आता बहुराष्ट्रीय कंपन्या ऑफर देत आहेत. मात्र, या ऑफर न पाहता खरेदी करताना गरीब विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहा. त्यात तुम्हाला दिवाळीचा आनंद दिसेल. तर मध्यमवर्गीयांसाठीस्थानिक व्यापारी आधारवड आहे. स्थानिक व्यापारी ग्राहकांचे हित लक्षात घेत काम करीत असतो. तो आर्थिकअडचणीत विश्वासाने उधारीवर मालाची विक्री करतो. होतकरू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तो आधारवड आहे…