मराठा आरक्षणासाठी सांगवी बु.येथे आमरण उपोषण
दि. ०१ (प्रतिनिधी) अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज पाटील जरांगे यांच्या चालू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगवी बु. ता. जि. नांदेड येथे गजानन कोकाटे व गणेश कोकाटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याचबरोबर सांगवी गावकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण देखील करण्यात येत आहे.
मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत व ओबीसी मध्ये 50% च्या आत आरक्षण द्यावे. या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात करोडो मराठे हे एकवटले आहेत. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. शेकडो गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. ठिकठिकाणी आमरण उपोषण, साखळी उपोषण, कॅन्डल मार्च काढून मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा दिला जात आहे.सांगवी बु. हे नांदेड महानगरपालिकेतील एक गाव असून या गावात देखील आमरण उपोषण व साखळी उपोषणास 31 ऑक्टोबर पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मराठा समाजा सोबतच इतर जाती व धर्मातील नागरिक देखील या ठिकाणी येऊन आपला पाठिंबा दर्शवत आहेत.आमरण उपोषणासाठी बसलेले गजानन कोकाटे व गणेश कोकाटे यांचा आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती बिघडत आहे, गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज पाणी घेतला आहे. परंतु अन्नत्याग सुरू असून मागणी मान्य होईपर्यंत तसंच चालू राहील असे ते बोलत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रभरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी करून आणि उपोषण करून देखील सरकार हे मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे राज्य व केंद्र सरकारचा गावकऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होत जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनावरच राहील. असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आंदोलनाचा एक भाग म्हणून ४ तारखेला गावामध्ये कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. तर ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनास निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी गावातील गावातून व परिसरातून मराठा बांधवासह सर्व जाती धर्मातील बांधव समर्थन देण्यासाठी उपोषण स्थळी येऊन उपोषण कर्त्यांना भेट देत आहेत.
आजच्या दिवशी आमरण उपोषण कर्ते गजानन कोकाटे, गणेश कोकाटे माजी नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे, प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्तरे, प्रा.नारायण अंभोरे, विनायक कोकाटे, दाजीबा कोकाटे, राजेश कोकाटे, अरुण कोकाटे, व्यंकटी कोकाटे, गजानन कोकाटे, सचिन कोकाटे, विलास कोकाटे, रुपेश कोकाटे, राजेगोरे, राजू कोकाटे आदींनी सहभाग नोंदवला.