500 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची मागणी
नांदेड, दि. 4 ः जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर मोठा ताण पडत आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. याचा दुष्परिणाम म्हणून रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यासाठी आणखी एका मोठ्या रुग्णालयाची गरज असून नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करुन 500 खाटांचे रुग्णालय उभे करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केली.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी शासकीय रुग्णालयास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. ते पुढे म्हणाले, की नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 खाटांची क्षमता होती. महाविकास आघाडी सरकारने या रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करुन 300 खाटांच्या रुग्णालय परिवर्तीत करण्याचा निर्णय घेतला. वाढीव खाटांच्या आवश्यकतेनुसार पद निर्मितीची भूमिका घेतली. यासंदर्भात नव्या सरकारला इमारत निर्मितीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने इमारत बांधकाम निर्मितीसाठी अलीकडल्या काळात पत्र दिले आहे.
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जे काही मृत्यूचे तांडव सुरु आहे. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. अशा परिस्थितीत तात्कालिक व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. 500 खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. अशावेळी दीर्घकालीन उपाययोजनेचा भाग म्हणून नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रस्तावित 300 खाटांची क्षमता वाढवून ती 500 करावी. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात 500 ऐवजी ती 700 पर्यंत न्यावी अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देवून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होईल.
हे सर्व राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. 41 जीव जावून काहीच धडा घेतला जाणार नसेल तर सर्वसामान्य गरिब नागरिकांना सुविधा व उपचार न करता जगणे-मरणे त्यांच्या नशिबावर सोडले तर जनता आपल्याला माफ करणार नाही असेही ते म्हणाले.