नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा हाहाकार ‘सखल भागासह शहरातील सर्वच नागरिक पाण्यामुळे परेशान’
नांदेड दि.२७ आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती ही पूर सदृश्य बनली आहे.शहरातील विष्णुनगर, देगलूर नाका, मिल्लत नगर,खुदबई नगर, गांधीनगर, श्रीनगर, आनंद नगर, बाबा नगर, गोविंद नगर पांडुरंग नगर यांच्यासह सर्वच भागामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. सखल भागांमधली तर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.या भागात तीन ते चार फूट पाणी साचले असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या नालेसफाई चेही यावेळी पितळ उघडे पडले. नाले सफाई व पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे अनेक भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक भागामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
तसेच पुढील काळामध्ये साचलेल्या पाण्यामुळे घरात कसे राहावे हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सेवेसाठी किंवा सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशा व्यवस्था केलेल्या दिसत नाही. तसेच पावसाचा जोर हा दिवसभर वाढत असल्यामुळे सर्व नागरिकांना सुविधा पुरवणे प्रशासनाला देखील शक्य होत नाही. एकूणच प्रचंड झालेल्या पावसामुळे शहरातील महानगरपालिकेने केलेले नियोजन व सेवा सुविधा यामध्ये किती कमतरता आहेत या उघड्या पडल्या आहेत. महानगरपालिकेने अगोदरच सखल भागातील आणि सर्व शहरातील पाण्याचा निचरा नीट होईल असे प्रभावी नियोजन करून कार्य केले असते तर आज नांदेडकरांना पाण्याच्या या समस्येमुळे हैराण होण्याची वेळ आली नसती.
महानगर पालिकेतील नियोजन हे ढिसाळ असल्याचेच वारंवार सिद्ध झाले आहे आणि त्यामध्ये निसर्गाने थोडाफार कहर केला तर नागरिकांचे प्रचंड हाल होतात हे वारंवार दिसून येत आहे तरीपण कुंभकर्णी झोपेत असलेल्या महानगरपालिका प्रशासनाला त्याचे काहीही देणे घेणे नाही, असेच दिसते योग्य वेळी योग्य नियोजन केले असते तर निश्चितच समस्यांचा सामना करणे सुलभ झाले असते तूर्तास निसर्गाच्या या रुद्र अवतारामुळे नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्वच नागरिक मेटाकुटीस आले आहेत यात शंका नाही.