मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी
नांदेड – सुमारे अडीच महिन्यांपूर्वी मणिपूर राज्यात सशस्त्र जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याची अतिशय निंदनीय व मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज अप्पर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांची भेट घेवून या संदर्भात केंद्र शासनासाठी निवेदन दिले. शिष्टमंडळात माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, काँग्रेसच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ.मिनलताई खतगावकर, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, प्रदेश उपाध्यक्षा डॉ. रेखा पाटील चव्हाण, माजी सभापती अपर्णाताई नेरलकर, मंगला धुळेकर, ललिता कुंभार, नसिम पठाण, रजिखा खान, प्रदेश प्रतिनिधी अनिल मोरे, महाबिजचे माजी संचालक राजेश पावडे, युवक काँग्रेस महानगराध्यक्ष विठ्ठल पावडे, माजी सभापती मसूद खान, प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर, माजी जि.प. सदस्य मनोहर शिंदे, सोनू संगेवार, गंगाधर कदम, नवल पोकर्णा, नागोराव पाटील चिमेगावकर, निलेश देशमुख बारडकर, सत्यजित भोसले, सतीश बसवदे व्यंकट कदम आदींचा सहभाग होता.
या निवेदनाच्या माध्यमातून काँग्रेस शिष्टमंडळाने अनेक प्रश्न उपस्थित केले. घटना घडल्यानंतर अडीच महिने ही गंभीर बाब पडद्याआड का ठेवण्यात आली? दोन समाजात द्वेष व शत्रुत्वाची भावना टोकाला पोहचली असताना केंद्र व मणिपूर सरकारचे प्रयत्न अपूरे का ठरत आहेत? या घटनेत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून संताप व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकार व तेथील राज्य सरकार जागे झाले. अशा घटना भविष्यात होऊ नये, यासाठी दोषींवर कडक कारवाई करावी अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.