हिमायतनगरच्या रखडलेल्या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करून तेलंगणातील कुबिर ते ढाणकी पर्यंतचा रस्ता महामार्गाला जोडण्याची आवश्यकता
हिमायतनगर/नांदेड, श्रीक्षेत्र माहूर येथे मा.ना.नितीनजी गडकरी ( केंद्रीय रस्ते विकास मंत्री भारत सरकार) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री रेणुका माता मंदिराच्या दर्शनासाठी कॅप्सूल लिफ्ट व स्काय स्काय वॉकचा उद्घाटन सोहळा दि. 20 रोजी थाटात संपन्न झाला. यावेळी हिमायतनगर तालुक्यातील तीर्थ क्षेत्राला जोडणारे नवीन रस्ते निर्माण करून 5 वर्षांपासून अर्धवट असलेला हिमायतनगर शहरातील रस्ता पूर्ण करण्यासाठी खासदार हेमंत पाटील, आ भीमराव केराम यांच्या उपस्थितीत बाबुराव कदम कोहळीकर व हिमायतनगर येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.
भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिमायतनगर शहरा पासून किनवट ह्या नॅशनल हायवे रस्त्याच काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले व मागील पाच वर्षापासून हे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्यामुळे हिमायतनगर शहरातील काम अर्धवट ठेवलं आहे. यामुळे शहरातील नागरिकांना वाहनधारकांना उन्हाळ्यात धुळीचा सामना तर पावसाळा घसरगुंडीच्या सामना करून अपघाताला निमंत्रण द्यावे लागत आहे. यामुळे अनेक किरकोळ अपघात झाले असून काहींना तर आपल्या जीव गमवावा लागला आहे. या अर्धवट रस्त्यामुळे अनेक काम पूर्ण व्हावे यासाठी विविध प्रकारे आंदोलने केली मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही.
याबाबत विविध वर्तमान पत्रात व नांदेड न्यूज लाईव्हने अनेकदा वृत्त प्रकाशित करून कुंभकर्णी झोपेत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग कामाची देखरेख करणारे अभियंता व गुत्तेदाराला जागृत करून रस्ता पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले. मात्र याकडे त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. या संदर्भात माननीय मंत्री नितीनजी गडकरी यांना तक्रार केली आहे. यावेळी बैठकीत आ भिमरावजी केराम किनवट, हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर, भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान, भाजपा तालुकाध्यक्ष किनवट संदिप केंदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष श्री किसनराव पाटील पळसपुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, भाजपा नेते किशन पाटील वानखेडे, शेख लतिफ यांची उपस्थिती होती.
या संदर्भात मा. मंत्री नितीन गडकरी साहेब सोबत झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या तक्रारी यासंदर्भात तातडीने मंत्री गडकरी साहेबांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवून त्या गुत्तेदाराला टर्मिनेट करणे व कायदेशीर कारवाई करण्याचा संदर्भात सूचना सुद्धा केल्या आहेत. तसेच हिमायतनगर तालुक्यामध्ये नवीन श्री शक्तीपीठ जोडो महामार्गासाठीची मागणी या निवेदद्वारे करण्यात आले आहे. हा महामार्ग तेलंगणा राज्यातील कुबीर रोडरना, वाशी, पार्डी, हिमायतनगर, पळसपुर, डोलारी, गांजेगाव मार्ग ढाणकीपर्यंत अंदाजे 45 किलोमीटर आहे.
त्यामुळे तेलंगणा – मराठवाडा- विदर्भातील दळण वळण सोईचे होऊन बासर, हिमायतनगर, ढाणकीहुन हरदडा, माहूर येथील तीर्थक्षेत्र जोडणारा नॅशन हायवेमध्ये रूपांतरित करून नवीन रस्ते निर्माण करावे असे निवेदन सुद्धा खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता नक्की पूर्ण करून देऊ असे आश्वासन माननीय गडकरी साहेबांनी भाजप शिवसेना शिष्टमंडळाला दिले.