स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी 5 मे रोजी नांदेड येथे डॉ. खान यांचे मार्गदर्शन
नांदेड दि. 2 – बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणार्या अडचणी, परीक्षेत नेमके काय साध्य करायचे, परीक्षेची स्पष्टता आणि यश संपादन करण्यासाठी दिल्ली येथील के.एस.जी. आयएएस इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ए.आर. खान यांचे शुक्रवार, दि. 5 मे रोजी ठीक ५ वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुव्दारा सचखंडचे उपमुख्य पुजारी बाबा ज्योतिंदरसिंघजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभाग भोकरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत अमना, नांदेड ग्रामीणचे सहायक पोलीस अधीक्षक गोहर हसन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मार्गदर्शन शिबिरात स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात, या परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी? स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पदवीधर होण्याची वाट पहावी का? बारावीनंतरही या परीक्षेची तयारी करता येते का? करिअरच्या वाटेवर असताना नेमके काय साध्य करायचे, एमपीएससी-यूपीएससी परीक्षेची स्पष्टता आणि यश संपादन करण्यासाठी कसे नियोजन करावे यासह विविध विषयावर डॉ. ए. आर. खान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे प्रा. शुद्धोधन गायकवाड, दत्ताहरी धोत्रे, मिलिंद चावरे, बाबुराव कसबे, संजय नरवाडे, डॉ. राम वाघमारे, भगवान गायकवाड, किशोर अटकोरे व चंद्रमुनी कांबळे यांनी केले आहे.