स्वाभीमानी आघाडीला पुन्हा टाळी देणार? अशोक चव्हाण-राजू शेट्टी यांच्यात बंद दाराआड चर्चा
नांदेड, 30 एप्रिल : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय भूकंप होणार असल्याचे अनेक दावे केले जात आहेत. अशात नांदेडमध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँगेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा झाली. सध्याची राजकीय परिस्थिती आणि या दोन नेत्याच्या भेटीमुळे चर्चा रंगत आहेत. याचं भेटीतून दोघांनीही आगामी काळात एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी आज राजकिय चर्चा केली. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या दोन नेत्यांची भेट महत्वाची मानली जाते. विशेष करुन सध्या महाविकास आघाडीकडे शेतकरी चेहरा नाही. त्यामुळे शेट्टी यांना सोबत आणण्याची काँगेसची ही रणनिती असल्याचं दिसते. आगामी काळात एकत्र येण्याचे संकेत देखील या दोन्ही नेत्यांनी दिले. दोघांची वैचारिक भुमिका एकच आहे. आगामी काळात एकत्र येऊन काम करू अशी भुमिका चव्हाण यांनी मांडली तर दोघांमध्ये राजकिय आणि सामाजिक चर्चा झाली असे शेट्टी म्हणाले. चर्चेचा तपशील मात्र त्यांनी सांगितला नाही.
महाराष्ट्र राज्यात आणखी एका नवीन पक्षाची एन्ट्री झाली. नांदेडमधूनच बीआरएस पक्ष राज्याच्या राजकरणात उतरला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये दोन सभा देखील घेतल्या आहेत. शेतकरी हिताच्या योजनांचा प्रसार सध्या बीआरएसकडून सुरू आहे. शिवाय राज्यांतील शेतकरी नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न देखील बीआरएसकडून सुरू आहेत. राजू शेट्टी जर बीआरएसमध्ये गेले तर या पक्षाला शेतकरी चेहरा मिळणार आहे. त्यामुळेच राजु शेट्टी यांना देखील बीआरएसने ऑफर दिली. पण आपण त्यांची ऑफर नाकारली. संघटना सोडून आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. मात्र, बीआरएसच आगामी काळातील काम पाहून ठरवावे लागेल असे देखील राजु शेट्टी म्हणाले.
शेतकरी नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न बीआरएसकडून सुरू आहे. मोठे चेहरे जर बीआरएसला मिळाले तर मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडी आणि आघाडीतील घटक पक्षांना बसू शकतो. त्यामुळे शेतकरी नेत्यांशी संगत करण्याचा हा काँगेसचा प्रयत्न दिसतो.